नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी, नेतृत्वात, कर्तुत्ववान,गुणांकडे झेप घेणाऱ्या… महिला !
भारताची स्त्री ही संस्काराची मूर्ती समजली जाते. तसेच स्त्री ही मातृत्वाचे आणि वात्सल्याचे प्रतीक आहे. फ्रेंच समाजवादी ,विचारवंत चाकंक्ष फेरिअर यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या राष्ट्राकडून स्त्रीला दिल्या जाणाऱ्या सामाजिक व राजकीय महत्त्वावरून त्या राष्ट्राची सांस्कृतिक उंची मोजता येते. जोपर्यंत महिला पुढे येत नाहीत, तोपर्यंत समाजाचे, राष्ट्राचे कल्याण होणार नाही. हे महात्मा गांधीजींचे उदगार योग्य वाटतात. डॉ. वसंतराव गोवारीकर म्हणतात की, स्त्रियांच्या हाती सत्ता दिली, सगळा कारभार जर सोपविला ; तर देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे.
अशाच प्रकारची एक उत्तम अभिनेत्री , कथ्थक विशारद, लेखिका , दिग्दर्शिका, निवेदिका, संवादिका,व नृत्यांगना अशा अनेक कलांनी व गुणांनी सज्ज असलेली तसेच अविरत कष्टाने व आनंदी मनाने “आनंदाचे शेत” (farm of happiness )संकल्पना कायम जोपासणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस या ग्रामीण भागातील एक आनंदी शेतकरी म्हणजे संपदाताई जोगळेकर… कुळकर्णी!
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच आई वडील कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रेरणेतून आवड असलेल्या गायन ,भाषण ,नृत्य, या क्षेत्राकडे सतत वाटचाल करत असताना, माझी आवड व गुण ज्यांच्या नजरेत पडले ,त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रथम बाल नाटकात व मालिकेत भूमिका करून आपली चुणूक दाखवली. त्यानंतर अनेक मालिकांतून, नाटकातून भूमिका, दिग्दर्शिका, निवेदिका, संवादिका, नृत्यकार अशा अनेक कलांनी उत्तम कारकीर्द गाजवून, भाजी मंडईतील भाजीची शॉपिंग करण्याची आवड जोपासत पुढे एका खेडेगावात जाऊन स्वतःची आवड जोपासत, भाजीच्या शेतीसह अन्य शेती करून अगदी आनंदाने व समाधानाने “आनंदाचे शेत” निर्माण करणारी स्त्री म्हणजे संपदाताई !
संपदा ताईंचा जन्म आणि शिक्षण ठाणे शहरात झाले. लहानपणापासूनच आपले विचार मांडावेत, भाषण करावे, विचार कायम असायचा. आरशासमोर बघून नाचायचं, हावभावयुक्त बोलायचं, अभिनय करायचा, अशा गुणांमुळेच वयाच्या सोळाव्या वर्षी अमोल पालेकर यांच्या ‘पाऊलखुणा ” या मालिकेत भूमिका करून एक अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू केला.
परंतु अशा विविध कलाक्षेत्रात सर्व काही समाधानाने जीवन चालू असताना ठाणे येथील राहुल कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला. राहुल सुद्धा उत्तम बासरी वादक आहेत. परंतु राहुल यांना गावातील शेतीची खूप आवड असलेले आपल्या फुणगुस गावी येऊन आपली शेती करण्याचा निर्णय घेतला. व गावाला येणे जाणे सुरू झाले. खरं तर वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत संपदाताई, अगदी झुरळाला सुद्धा घाबरणारी व त्यामुळे ताप व घाम येणारी संपदा आईच्या प्रेरणेने व पती राहूल यांच्या भक्कम आधारामुळे फुणगुस ते ठाणे असा आठ दहा तासां एकटीच प्रवास करत चार चाकी गाडीचे स्वतः ड्रायव्हिंग सहजच करू लागल्या. सोबतीला दुसरं कोणी नसेल तरी गावातून मुंबईला एकटी जाण्यासाठी दिवसा किंवा रात्री त्यांना काहीच अडचण येत नाही. एक स्त्री म्हणून आपण स्वतःच्या बळावर काही करू शकतो हा आत्मविश्वास वाढू लागला.
पती बरोबर किंवा पती शिवाय स्वतः एकटी गाडी चालवून कामाची फिरती करू लागल्या. असाच एकदा प्रसंग आला की,कशेडी घाटात ट्राफिक पोलीस वाहनांची तपासणी करत होते, त्यावेळी मी एकटीच ड्रायव्हिंग करत मुंबईला प्रवास करत असल्याचे पाहून पोलिसांनी आस्थेने चौकशी केली, व हा एकटीचा प्रवास धाडसी व दुर्मिळ असल्याचे बोलले. त्या एवढ्या आत्मविश्वासाने वावरू लागल्या. माझे पती राहुलच्या शेती कामात लक्ष घालण्यासाठी मुंबईवरून गावाला स्थलांतर होऊन संसार सुरू झाला. राहुल यांनी मनोमनी जपानी शेतीतज्ञ व तत्त्वज्ञ फुकुओका यांना गुरू मानले होते. त्यांच्या तत्वाप्रमाणे यांनी नैसर्गिक जमिनीत त्या स्थितीत शुद्ध हवामानात कोणत्याही रासायनिक खताचा अजिबात वापर न करता एक कृषी व पर्यटन सुरू केले व कामानेच ठाम विश्वास मनात दृढ झाला. सुरुवातीला राहुल गावाला स्थलांतर झाल्यानंतर शेती कामाकडे लक्ष देत होते, तर संपदा ताई ठाण्यात घराची जबाबदारी पूर्ण करत होत्या.
सद्धया शेती कामात उभयतांनी झोकून देऊन,भात, नाचणी,हळद ,कुळीथ,पावटा,शिवाय आंबा,काजू बागायतीकडे प्रत्यक्ष लक्ष देऊन कोणतीही रासायनीक औषधांची फवारणी न करता शेती पिकवली जाते. नैसर्गिक वाढीने शुद्ध हवेत तयार झालेला आंबा येथे पहावयास मिळतो. काही झाले तरी १० मे शिवाय आंबा उतरवला जात नाही. म्हणजे खरोखर झाडावरच तयार झालेल्या हापूस आंब्याची चव तेंव्हाच कळते हे लक्षात घेतलं व पर्यटकांना सांगितलं.
ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या पडवळ,दोडका, चिबूड,तवसं ,भेंडी ,कलिंगड, कंद,कणगर,सुरण,काजूगर, तसेच पालेभाज्यां सुद्धा रासायनीक खताशिवाय या शेतातून उपलब्ध होतात.अशा प्रकारे सहा,सात एकर जमीन शेती लागवडीखाली असून, बाकी जमीन नैसर्गिक जंगल झाडांसाठी राखून ठेवलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्राणी,पक्षी तेथे आढळतात.म्हणजे बेडूक,सरडा, ससे,भेकर,बिबट्या,मुंगूस, साळिंदरअसे प्राणी,व पोपट,मोर,लांडोर,असे अनेक पक्षी सुद्धा येथे दिसतात.व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे प्राणी,पक्षी असायलाच पाहिजेत,असंही संपदाताई व राहुल तळमळीने सांगतात.
शेतीच्या कामासाठी अठरा सहकारी माणसं,असून काही गुरे आहेत.शेती रखवालीसाठी पाळीव कुत्रेही आहेत. सहकारी माणसं, गुरे,कुत्रे यांच्यावर या उभयतांचं तितकंच प्रेम दिसून येते. वर्षाच्या ३६५ दिवसांमध्ये सहकारी माणसांकडून रोज कामासाठी समन्वय राखला जातो. कधीही कामाची कुरकुर नाही, कारण त्यांची गरज ओळखून विशेष सण गौरी गणपती , शिमगा अशा काळात सहकारी माणसे त्यांच्यातच ते समायोजन करून कामामध्ये सातत्य राखतात.त्यामुळे काम करणाऱ्या सहकाऱ्यांना संपदा वहिनी व राहुल दादा यांचा काही त्रास होत नाही तर आधारच वाटतो. सहकाऱ्यांची मुले गावाला आल्यावर या उभयतांना भेटल्याशिवाय जात नाहीत. त्यांची आस्थेनेने चौकशी करणे ,काही निर्णयात मार्गदर्शन करणे त्या मनापासून करतात.
शेतीच्या कामाची उभयतांना सवय झाल्याने पेरणी करणे, नांगरणे, चिखल करणे, रोपे काढणे, लावणी करणे, अशी कामे अगदी आनंदाने शेतात करताना दिसतात. गोठ्यात असणाऱ्या गुरांची काळजी घेताना प्रसंगी गाईची प्रसूती, किंवा वेळ पडल्यास ऑपरेशन साठी डॉक्टरना मदत करतात. अशा कामांमुळे स्त्री म्हणून काम करताना आत्मविश्वास वाढल्याने सहज करतात.
फक्त शेतीत दम नाही, किंवा हल्ली शेतीत, उत्पन्न मिळत नाही, अशी ओरड न करता मनापासून शेतात कष्ट करून जे उत्पन्न सर्व प्रकारे मिळते, यासाठी कुठेही बाहेर विकायला न जाता कोकणात येणाऱ्या बाहेरील पाहुणे म्हणजे पर्यटक यांच्यासाठी व्यवस्था जर केली तर “कृषी पर्यटन ” म्हणून सुरू केले तर शेतात तयार होणारा सगळ्या प्रकारचा माल येथेच शुद्ध स्वरूपात पर्यटकांना खाऊ घालता येईल, ग्रामीण वातावरण, शेती,कोकणातील ग्रामीण चालीरिती,परंपरा, कोकणी निसर्ग ,लाल माती, प्राणी, पक्षी,यांची माहिती व अंनाभान याची माहिती पर्यटकांना देता येईल, अशा संकल्पनेने “कृषी पर्यटन ” हा शेती पूरक
व्यवसाय शेतावरच शेत घरात सुरू करण्यात आला. व राज्यातून ,देशातून,परदेशातून वेगवेगळे पर्यटक येथे येतात. व लोप पावत असलेल्या ग्रामीण कामे,परंपरा,माती,चिखल, कच्चा रस्ता,ब़ैलगाडी,गुरांचा गोठा,गवतारु मांडव, तेथील उपलब्ध लाकडाचे फर्नीचर, ,अ़ंगणातील झोपाळा,टेकडीवरचे धुके,हंगामातील काजव्यांचे थवे, आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य, परसातील फुलझाडे, फळझाडे,औषधी झाडे, गवताची झोपडी,कातळ शिल्प,कोकणची पर्यटन स्थळे,आनंदाच्या शेतातील सर्व प्रकारची कामे ,गाईचे दूध काढणे, अंगणात रांगोळी काढणे,अशा सर्व गोष्टी व कामांचा आनंद मिळावा व कोकणातील पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी दूरवरून अगोदर बुकिंग करून येथे येत असतात. मग कुटुंब स्वरूपात किंवा छोट्या सहलीच्या स्वरूपात येत असतात.येथे घरात निवास खोल्या तयार करण्यात आल्या असून,अंगणापासून अगदी घरापर्यंत पूर्णपणे सर्व जमीनीला शेणाचे सारवण केले जाते.
या शेतात तयार होणारा सर्व उत्पादीत धान्य,भाज्या माल येथे येणाऱ्या पर्यटकांना खाऊ घालूनच उपयोगी आणले जाते. व हा ” कृषी पर्यटन ” व्यवसाय संपदाताई व राहुल अगदी कष्टाने यशस्वीपणे चालवतात. त्यामुळे पिकवल्या जाणारे,उत्पादीत अन्न ,वस्तू, बाहेर कुठेही विकायची गरज नसते. कारण येथे जाग्यावरच आलेल्या पर्यटकांना तयार शुद्ध बिना रासायनिक खताचा आस्वाद मिळतो.
कृषी पर्यटनासाठी नियम काटेकोरपणे पाळावे लागतात उदाहरणार्थ धूम्रपान ,मद्यपान करण्यासाठी येथे परवानगी नाही.
पर्यटकांना आनंदाच्या शेतात नाश्ता, चहा, जेवण, अंगणातील खेळ, गप्पा गाणी, झोपाळ्यावरील झोके, अशा अनेक गोष्टी घेतल्या जातात. जेवणात चेष्टा कोकणातील मराठी जेवण मानले जाते.
अशा अत्यंत कष्टाने यशस्वीपणे एक महिला शून्यातून पतीच्या आधाराने ” कृषी पर्यटन “व्यवसाय चालवून शेती अजूनही उत्तम करता येते. व शेतीला पूरक व्यवसाय करता येतो,व स्वावलंबी नक्की होता येतं हे अगदी संपदाताईनी पटवून दिले आहे . गरज फक्त आहे योग्य नियोजन ,कष्ट, दूरदृष्टी व आत्मविश्वासाची!
*▪️लेख शब्दांकन. ….*
*▪️श्रीकृष्ण खातू /धामणी /संगमेश्वर – मो.नं.८४१२००८९०९*