अटारी-वाघा बॉर्डरवर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पाहा नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळा…

Spread the love

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दरवर्षी अमृतसरच्या अटारी-वाघा बॉर्डरवर नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळा आयोजित केला जातो. यावेळी भारत आणि पाकिस्तान सूर्यास्तापूर्वी एकाच वेळी आपले राष्ट्रध्वज खाली उतरवतात.

अमृतसर/ वाघा बॉर्डर- देशभरात आज, 26 जानेवारीला 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे, यंदाही राजधानी नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तिन्ही दलांच्या सैनिकांनी चित्तथरारक कवायती सादर करत शक्तिप्रदर्शन केलं.

नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळा….

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, अमृतसरच्या अटारी-वाघा बॉर्डरवर आयोजित करण्यात येणाऱ्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यानं पुन्हा एकदा भारतातील लोकांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी जागृत केली आहे. बॉर्डरवरील नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह तालबद्ध बीट्स आणि देशभक्तीपर सूरांसह प्रजासत्ताक दिनाचा समारोप झाला. अटारी-वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तान सूर्यास्तापूर्वी एकाच वेळी आपले राष्ट्रध्वज खाली उतरवतात.

वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगलं…

शिस्तबद्ध रांगेत चाललेलं संचलन, भव्य पेहराव आणि भारतीय सैन्याच्या जवानांचा कधीही न संपणारा उत्साह यामुळे वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगलं होते. येथे पाकिस्तानी सैन्याच्या जवानांनीही जबरदस्त शौर्य दाखवलं. दोन्ही सैन्याच्या जवानांमधील समन्वयाचं दृश्य खूपच अनोखं होतं. हे दृष्य सैन्याच्या सामर्थ्याचं आणि राष्ट्राभिमानाचं प्रतीक आहे.

दोन देशांमधील परस्पर आदराचं प्रतिक…

अटारी-वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट कार्यक्रम हा प्रजासत्ताक दिनाचा महत्त्वाचा भाग असतो. हा कार्यक्रम केवळ सैन्य सामर्थ्याचं प्रदर्शनच नाही तर सीमेपलीकडील दोन शेजारी देशांमधील मानवता आणि परस्पर आदराचं प्रतीक आहे. हा कार्यक्रम दरवर्षी लाखो प्रेक्षकांना आकर्षित करतो. यंदाचा कार्यक्रमही त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. भारतीय सैन्याच्या अतूट धैर्यानं आणि देशभक्तीच्या भावनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की आपण भारतीय कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव उभे राहू.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page