अल्पवयीन मुली गायब का होतात? पुढे त्यांचे काय होते?

Spread the love

पालकांची जबाबदारी मोठी; आई-वडिलांनी सतत संवाद ठेवण्याची गरज.

जनशक्तीचा दबाव न्यूज | कळंब (उन्मेष पाटील) | सप्टेंबर २८, २०२३.

पालकांत आणि मुलींमध्ये संवाद नसेल, वयातील काही शारीरिक नैसर्गिक बदलामुळे असेल, समाजमाध्यमांतील चुकीच्या संपर्कामुळे असेल किंवा कोणी फूस लावून, वेगवेगळे आमिष दाखवून व मुलींच्या सामाजिक अपरिपक्वतेचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलींना पळवून न्यायच्या घटना अनेकदा समोर येतात. काही घटनांची पोलीस दरबारी नोंद होते, काही घटना लोकलज्जेस्तव नोंदवल्या जात नाहीत, मात्र या अल्पवयीन मुलींनी अजाणतेपणाने उचलेले पाऊल त्यांचे भविष्य अंधःकारमय करत असल्याचे अनेक प्रकरणांत समोर आले आहे. या संकटातून बाहेर पडून पुढे अनेक मुलींनी स्वतःला सिद्ध केल्याचीही उदाहरणे आहेत.

अल्पवयीन मुलींसोबत काही गुन्हा घडला तर कायद्यात कडक शिक्षेच्या तरतुदी केल्या आहेत. मुलीचा गैरवापर केला किंवा मुलीने पोलिसांत तक्रार केली तर त्याच्यावर भारतीय दंडविधान कलम ३५४ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन आरोपीला ५ ते १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलीचे अपहरण केले तर १० वर्षे सजा, दंड किंवा दोन्हीही ठोठावण्याची तरतूद आहे. अल्पवयीन मुलींना विवाहासाठी पळवणे यासाठी १० वर्षे शिक्षा आणि दंड, अल्पवयीन मुलींना त्यांच्याजवळील वस्तूंची चोरी करण्यासाठी पळवणे यासाठी ७ वर्षे शिक्षा, दंड किंवा दोन्हीही, अल्पवयीन मुलींना देहविक्री व्यवसायासाठी विकणे किंवा विकट घेणे १० वर्षे शिक्षा, दंड किंवा दोन्हीही अशा तरतुदी कायद्यात आहेत.

याउपरही अनेक अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्याच्या बातम्या नियमित येत असतात यासाठी समाजमाध्यमांच्या माध्यमातून वाढलेला चुकीच्या लोकांशी संपर्क जबाबदार असल्याचे बऱ्याच घटनांमध्ये समोर आले आहे. कोणीतरी आपल्याकडे विशेष लक्ष देत आहे ही भावनाही त्या वयात सुखावणारी असते. परिणामी सामाजिक, व्यवाहारिक व व्यक्ती ओळखण्याची परिपक्वता नसणाऱ्या मुली अशा फसवणाऱ्या मुलांना, व्यक्तींना बळी पडतात व घरातून पळून जातात असे दिसून आले आहे.

सोबत नेलेले पैसे संपले, पोलिसांचा, कुटुंबियांचा ससेमिरा मागे लागला म्हणून सोबतचा मुलगा सोडून पुन गेला अशा काही प्रसंगांत मुली परत येतात. मुलींना पळवून नेणारी काही मंडळी चुकीच्या लोकांच्या हवाली करून त्यांच्या आयुष्याला काळोखात ढकलतात. त्यामुळे समाजमाध्यमांतून किंवा दैनंदिन जीवनात संपर्क ठेवताना मुलींनी काळजी घ्यायची आवश्यकता आहे.

अल्पवयीनपेक्षा सज्ञान मुली, महिलांची नोंद अधिक.

मागील ८ महिन्यांत कळंब पोलीस ठाण्यात ७ ते ८ मुली, महिलांच्या मिसिंग तक्रारी दाखल आहेत. यातील काही नुकत्याच १८ वर्षे पूर्ण झालेल्या म्हणजे कायद्याच्या भाषेत सज्ञान, तर काही विवाहिताही आहेत.या ८ महिन्यांत अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची एकही नोंद पोलिसांत नाही.

या मुलींचे पुढे काय होते?

पळवून नेलेल्या किंवा घरातून पळून गेलेल्या मुलींचा शोध लागला तर पोलीस त्यांच्या पालकांना बोलावून मुलींना त्यांच्या ताब्यात देतात.

मुलींनी पालकांकडे जाण्यासाठी नकार दिला तर त्यांना सुधारगृहात पाठविले जाते. ज्या मुलींचा शोध लागत नाही त्या पोलीस फाईलमध्ये मिसिंगच रहातात.

शोध लागला तरी तक्रार महत्त्वाची…

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध लागला तरी तिने किंवा तिच्या पालकांनी संबंधित आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार द्यायला हवी., तरच त्या व्यक्तीवर कायद्याचा बडगा उगारू शकतो. काहीजण तक्रार करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने आरोपी मोकाट सुटतो.

कारणे काय?

अल्पवयीन मुली गायब होण्याचे मुख्य कारण कथित प्रेमप्रकरण असल्याचे घटनेत समोर येते. मुलांच्या स्टायलिश, झकपक राहण्याला, त्यांच्या चमकोगिरीला, बोलण्याला, आमिषाला बऱ्याच मुली बळी पडतात. घरातील तणावाचे, विसंवादाचे वातावरणही अनेकदा मुलींना घर सोडून जाण्यासाठी निमित्त ठरते.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

मुलींशी, विशेषतः वयात येणाऱ्या मुलींशी आई-वडील दोघांनीही सतत संवाद साधावा. मुलीच्या मित्र-मैत्रिणींशी बोलावे, शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांशी विचारपूस करावी. मोबाईलमध्ये किती वेळ लक्ष असते? समाजमाध्यमांत ती कोणाशी संपर्कात असते? ती चुकीच्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात तर नाही ना? यांकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. घरातून प्रेम-आपुलकी नाही मिळाली तर मुले-मुली बाहेर खांदा शोधतात व त्यात फसतात. यासाठी नाजूक वयात पालकांचीही जबाबदारी मोठी असते. मुलींच्या भावनांचाही काहीजण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याबाबतही पालकांनी मुलींना सावध करणे गरजेचे असते.

“आपली मुलगी किंवा मुलगा कोणाच्या संपर्कात आहे, याची माहिती पालकांना असायला पाहिजे. मुलांशी, मुलींशी सातत्याने पालकांनी बोलायला हवे, त्यांच्या अडचणी काय आहेत? कोणी त्यांना काही गोष्टींवरून ब्लॅकमेलसारखे प्रकार करीत आहे का? मानसिकदृष्ट्या छळत आहे का? याचीही माहिती विश्वासात घेऊन काढायला हवी. मुला-मुलींचे वागणे अचानक बदलले तर याबाबत त्यांच्याशी नक्कीच चर्चा करायला हवी. पालकांनी त्यांचे मित्र बनायला हवे.” – श्री. सुरेश साबळे (पोलिस निरीक्षक, कळंब.)

  

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page