
नवी दिल्ली : एअर इंडियात प्रत्यक्ष विमानोड्डाणाशी संबंधित नसलेल्या (नॉन-फ्लाइंग) कर्मचाऱ्यांसाठी कंपनी प्रशासनाने शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती योजना घोषित केली. टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर घोषित झालेली ही दुसरी स्वेच्छानिवृत्ती योजना आहे. ही योजना ३० एप्रिलपर्यंत खुली असणार आहे.
एअर इंडियाकडे सध्या विमानोड्डाणात प्रत्यक्ष सहभागी असलेले (फ्लाइंग) आणि नसलेले (नॉन फ्लाइंग) असे एकूण ११ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी या नव्या योजनेचा लाभ २,१०० कर्मचाऱ्यांना होईल, असा दावा एअर इंडिया प्रशासनाने केला आहे.
एअर इंडियाचा ताबा आल्यानंतर टाटा समूहातर्फे ही आर्थिक अडचणीत असलेली कंपनी फायद्यात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विहान.एआय या उपक्रमाची घोषणा टाटा समूहाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात केली होती. हा उपक्र पाच वर्षे राबवला जाणार आहे. यामध्ये विविध उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत. या उपक्रमात तयार करण्यात आलेल्या आराखड्यात कंपनीला स्थायी विकासासाठी, नफा कमावण्यासाठी तसेच नागरी विमानसेवा क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी सक्षम करणे हे मुख्य उद्देश आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे कर्मचारी १७ मार्च ते ३० एप्रिल या काळात स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करतील त्यांना योजनेचे लाभ मिळतील. शिवाय सानुग्रह अनुदानाची (एक्स-ग्रेशिया) रक्कमही एकगठ्ठा लाभ या स्वरूपात मिळणार आहे.
जे लायक कर्मचारी ३१ मार्चपर्यंत अर्ज करतील त्यांना सानुग्रह अनुदानाच्या रकमेव्यतिरिक्त एक लाख रुपये दिले जातील.

