जर तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असाल तर लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतील. याच कारणामुळे भात कितीही आवडत असेल तरीही लोक भात खाणं टाळतात. भारतात दक्षिणेला सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो. साऊथ इंडियाचे फेमस पदार्थ जसं की इडली, डोसा, अप्पम, खीर, अप्पे या सगळ्यात पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य घटक आहे. तिथल्या जास्तीत जास्त पदार्थांत तांदूळ असतो. (Best Way To Eat Rice) पण इतका भात खाऊनही त्यांचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. एक्सपर्ट्सच्या मते भात खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच तुम्ही किती भात खाताय हे सुद्धा महत्वाचे असते.
आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी लोकमत सखीशी बोलताना भात खाण्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करत भात कसा खावा, कसा शिजवावा याबाबत सांगितले आहे. डॉ. परीक्षित शेवडे सांगतात, ”रोजच्या स्वंयपाकात भात शिजवताना काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की तुम्ही वापरत असलेला तांदूळ हा जुना असावा. किमान वर्षभर जुना असलेला तांदूळच वापरावा. जर तांदूळ जुना नसेल तर तांदूळ शिजवण्याआधी कोरडे तांदूळ परतून घ्या. यामुळे तांदळातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होईल. भात शिजवताना कुकरऐवजी ओपन वेसल्सचा वापर करा ज्यामुळे भात जास्त पौष्टीक होईल.”
वरण-भात, तूप,लिंबू बेस्ट कॉम्बिनेशन…
डॉ. परीक्षित यांच्या मते महाराष्ट्रीयन जेवणाची पद्धत वरण भात तूप-लिंबू हे बेस्ट कॉम्बिनेशन आहारात असेल तर कोणताही त्रास उद्भवणार नाही. कारण यातील घटक-तूपातील फॅटी एसिड, लिंबातील एसिटीक एसिड यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि भाताचे पोषण मूल्य अधिक वाढते.
भात आणि पोट सुटण्याचा काही संबंध आहे का…?
भारतात ९० टक्के लोकांचे स्टेपल डाएट हे भात आहे. पूर्वीपासून भात खाणाऱ्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली होती असं नाही. पूर्वी अंग मेहनत खूप व्हायची, आता ती होताना दिसत नाही म्हणून पोट सुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्ही व्यायाम करणार नाही आणि फक्त भात बंद कराल, यामुळे पोटं सपाटीला जातील असं अजिबात होणार नाही. भात योग्य पद्धतीने शिजवल्यास भात खाण्याचा कोणताही त्रास होणार नाही आणि पोटही सुटणार नाही. यासाठी नियमित व्यायामाची सवय ठेवा.