
दिल्ली विधानसभेचं (Delhi Elections 2025) मतदान संपल्यानंतर आता विविध एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
*नवी दिल्ली :* दिल्ली विधानसभेच्या (Delhi Elections 2025) सर्व 70 जागांसाठी बुधवारी (5 फेब्रुवारी) मतदान झालं. यानंतर आता 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल आणि दिल्लीतील जनतेनं सत्तेची चावी कुणाच्या हाती दिली हे स्पष्ट होईल. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP), भाजपा (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे तीनही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. मतदान संपल्यानंतर आता विविध एजन्सींचे एक्झिट पोल समोर आलेत.
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपाला दिल्लीत पूर्ण बहुमत मिळू शकते. अंदाजानुसार, भाजपाला 39-44 जागा मिळू शकतात. तर ‘आप’ला 25-28 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसला 2-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मॅट्रिजच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यावेळी दिल्लीत भाजपा आणि आप यांच्यात जोरदार लढत आहे. अंदाजानुसार, भाजपाला 35-40 जागा, ‘आप’ला 32-37 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळू शकतात.
पीपल्स पल्स या पोल एजन्सीच्या एक्झिट पोलचे देखील आकडे समोर आले आहेत. त्यानुसार दिल्लीत भाजपा सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता आहे. एक्झिट पोसनुसार, भाजपाला 51-60 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर ‘आप’ला 10-19 जागा मिळू शकतात.
*पी-मार्क एक्झिट पोल :*
पोल एजन्सी पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, आम आदमी पार्टी सलग तिसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन करू शकते. एक्झिट पोलनुसार, ‘आप’ला 39-49 जागा मिळू शकतात. तर भाजपाला 21-31 आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पीपल्स इनसाईटच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा झाला, तर भाजपाला 40-44 जागा मिळू शकतात. सत्ताधारी ‘आप’ला 25-29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 0-1 जागा मिळू शकतात.
*जेव्हीसी एक्झिट पोल :*
पोल एजन्सी जेव्हीसीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, दिल्लीत भाजपाला 39-45 जागा मिळू शकतात. तर ‘आप’ला 22-31 आणि काँग्रेसला 0-2 जागा मिळू शकतात.
*डीव्ही रिसर्च एक्झिट पोल-*
आप – 26-34
भाजपा – 36-44
काँग्रेस – 0
*पोल डायरी एक्झिट पोल-*
भाजपा – 42-50
आप – 18-25
काँग्रेस – 2
*डीयू-सीजीएस सर्वेक्षणात ‘आप’ सरकार :*
दिल्ली विद्यापीठाच्या सेंटर फॉर ग्लोबल स्टडीज (सीजीएस) ने केलेल्या सर्वेक्षणात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, ‘आप’ला 44.90 टक्के मतांसह 41 जागा मिळू शकतात. तर भाजपाला 41 टक्के मतांसह 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला खाते उघडण्याची अपेक्षा नाही.
*बहुमताचा आकडा किती? :*
यावेळी दिल्ली निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि काँग्रेस यांच्यात असल्याचं सांगितलं जात आहे. एकूण 70 जागांसह विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 36 जागांची आवश्यकता असेल.