लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज मतदान, कोणते उमेदवार आहेत रिंगणात?..

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांसाठी आज (26 एप्रिल) 8 जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोणते महत्त्वाचे उमदेवार रिंगणात आहेत? काय स्थिती आहे, याविषयी जाणून घ्या.

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा होणारा प्रचार 24 एप्रिलला संपला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे. 8 पैकी 3 जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी 204 उमेदवार रिंगणात आहेत.

विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा जागांसाठी 26 एप्रिलला (शुक्रवार) मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत 16,589 मतदान केंद्रांवर होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळित पूर्ण करण्यासाठी आठही जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

🔹️अशी आहे मतदारांची संख्या-

दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात एकूण 1,49,25,912 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार – 77, 21, 374 आहेत. तर 72,04,106 महिला मतदार आहे. तर 432 तृतीयपंथीय मतदार आहेत.
अशी आहे उमेदवारांची संख्या
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक अमरावतीमध्ये 37 उमेदवार आहेत. त्याखालोखाल परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्धामध्ये 24, नांदेडमध्ये 23, बुलढाणामध्ये 21, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात 17 आणि अकोलामध्ये 15 अशी मतदारांची संख्या आहे.

▪️हिंगोली- हिंगोलीत शिवसेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना तिकीट नाकारून बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे.

▪️परभणी- महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव (यूबीटी) यांच्या विरोधात परभणी लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

▪️नांदेड- नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर हे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या विरोधात आहेत.

▪️बुलढाणा- शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.

▪️यवतमाळ-वाशीम -शिवसेनेने यवतमाळ-वाशीममध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकिट नाकारले आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

▪️अकोला- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे प्रजासत्ताक सेनेचे उमेदवार म्हणून अमरावतीत रिंगणात आहेत. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत आहे.

▪️अमरावती- अमरावतीत भाजपाचे उमेदवार म्हणून खासदार नवनीत राणा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे लढत आहेत. तर दिनेश बुब हे विधानसभेत दोन आमदार असलेल्या सत्ताधारी आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवारही रिंगणात आहेत.

▪️वर्धा- वर्ध्यात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणारे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (VBA) आठपैकी सात जागा लढवित आहेत. बुलढाणा, यवतमाळ-वाशीम आणि हिंगोली या जागांवर शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांविरोधात लढणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील संपूर्ण विदर्भातील लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी 63.70 टक्के मतदान झाले. देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page