व्हॉट्सअॅपमध्ये दररोज काही ना काही नवीन अपडेट पहायला मिळत आहे. यातच आता याबाबत आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवरील व्हेरिफिकेशन बॅजचा रंग आता बदलण्यात येणार आहे. हिरव्या रंगात असणारा हा बॅज आता निळ्या रंगात दिसणार आहे.
WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड बीटा 2.23.23.18 या व्हर्जनमध्ये हा अपडेट दिसला असल्याचं वेबसाईटने स्पष्ट केलं आहे. यामुळे लवकरच हा बदल सर्व यूजर्सना लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे व्हेरिफिकेशन बॅज ?
व्हॉट्सअॅपवर असणारं एखादं चॅनल किंवा बिझनेस अकाउंट हे खरं असल्याची पडताळणी केल्यानंतर व्हॉट्सअॅप त्यांना व्हेरिफिकेशन बॅज देतं. सध्या हे बॅज हिरव्या रंगात दिसत आहे. मात्र, मेटाच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे बॅज निळ्या रंगाचं आहे. त्यामुळे लवकरच व्हॉट्सअॅपवर देखील याचा रंग बदलण्यात येणार आहे.
सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती, की व्हॉट्सअॅप बिझनेस यूजर्स देखील आता मेटा व्हेरिफाईड सेवेचे लाभ घेऊ शकतील. अर्थात, यासाठी त्यांना मासिक किंवा वार्षिक फी भरावी लागणार आहे.