प्रभू श्रीरामांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध. – प्रमोद अधटराव.
संगमेश्वर | जानेवारी ४, २०२४.
“ज्यांनी आयुष्यभर अखिल हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवण्याचे दुःसाहस केले, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले; रावणाला मूलनिवासी मानून त्याची पूजाअर्चना सुरू करून हिंदू धर्मियांचा बुद्धिभेद करण्याचे महापाप केले अशा ‘शप’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आता प्रभू श्रीरामांनी वनवासात मांसाहार केला असे सांगून ते आमचे मांसाहार करण्याइतपतच आदर्श असल्याचे म्हणत आहेत. त्यांच्या या क्षुद्र मनोवृत्तीचा समस्त हिंदू जनांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो.” असा प्रहार करत प्रमोद अधटराव यांनी आपला संताप व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “मुळात रामरायाचा वनवासाच्या काळात आहार काय होता हा संशोधनाचा विषय होऊच शकत नाही. तर रामरायाने वनवासाच्या काळात संपूर्ण भारतवर्षापुढे काय आदर्श प्रस्थापित केला हा संशोधन विषय आहे. मात्र रामाचे अस्तित्व नाकारणारे आज राम बहुजनांचा होता आणि तो मांसाहार करायचा म्हणजे हिंस्त्र होता असे सांगून काय साध्य करू इच्छितात? अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराजांना महत्त्व आहे असे म्हणणारे नादान, बाजारबुणगे त्याचवेळी कायद्याच्या चौकटीत अडकले नाहीत त्यामुळे त्यांची आता प्रभू श्रीरामचंद्रांवर अनर्गल टिप्पणी करण्याची हिंमत झाली आहे.”
“आमदार रोहित पवारांचे अभिनंदन. किमान त्यांनी या बेताल वक्तव्यावर नाराजी प्रकट करून त्यांच्यातील कुकर्मींचे कान उपटले. मात्र तथाकथित, हिंदुत्ववादी उबाठा सेना मात्र शेपूट घालून गप्प आहे. स्वर्गीय बाळासाहेबांच्या आत्म्याला ज्या यातना होत असतील त्याची कल्पना न केलेलीच बरी. स्वा. सावरकर खरेच द्रष्टे होते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ज्यावेळी हिंदुत्व देशव्यापी होईल त्यावेळी काँग्रेसी कोटावर जानवे घालून पुढे येतील. आज आव्हाडांसारख्या नीच प्रवृत्तींनी हे सप्रमाण सिद्ध केले. ‘जनता राम की दिवानी हैं।’ आता कळवा-मुंब्रामधून हद्दपार होण्याची वेळ जवळ आली आहे हे आव्हाडांनी लक्षात ठेवावे.” असा इशारा द्यायला अधटराव विसरले नाहीत.