जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले सावित्रीबाईंना अभिवादन…!
रत्नागिरी | जानेवारी ०४, २०२३.
स्त्री-शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, भारतातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रत्नागिरी शहरातील आशा सेविकांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजपा नेते, मा. आम., रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळ माने, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, शहराध्यक्ष श्री. राजन फाळके व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आशा सेविकांनी आपल्या समस्या मांडत त्यांना न्याय देण्याची आर्जवी मागणी केली. शहरात तसेच खेड्यांत प्रवास करताना एक स्त्री म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि ऊन, पाऊस, थंडी अशा विषम परिस्थितीत काम करताना सहन करावी लागणारी लोकांची मानसिकता या सर्व गोष्टी अल्प मानधनात सांभाळताना होणाऱ्या त्रासाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी बाळासाहेब माने म्हणाले, “सावित्रीमाईंचे व्रत आज तुमच्या माध्यमातून चालू आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांनी जो त्रास भोगला, आज त्याच वाटेने प्रवास करताना दुर्दैवाने तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय ‘स्त्री’चा संघर्ष अनादी काळापासून चालत आला आहे. मी तुमच्या मेहनतीचे मोजमाप करू शकत नाही पण आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी तुम्हा सर्वांच्या समस्या सरकार दरबारी मांडून त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो.”
भाजपा रत्नागिरी शहर व महिला मोर्चा रत्नागिरी (द.) यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास आशा सेविकांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्हा चिटणीस दादा ढेकणे, पदवीधर प्रकोष्ठ संयोजक मनोज पाटणकर, आय.टी. प्रकोष्ठ संयोजक निलेश आखाडे, शहर चिटणीस मंदार खणकर, सौ. शोनाली आंबेरकर, उपाध्यक्ष नितीन जाधव, सागर खेडेकर, अमित विलणकर, सचिन गांधी, तुषार देसाई, मंदार मयेकर, श्री. सावंत, श्री. आयरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रियल जोशी, सौ. अनुश्री आपटे, सौ. शीतल पंडित, स्नेहा जोशी, जिल्हा सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. प्राजक्ता रुमडे, चिटणीस सौ. दिपा देसाई, रत्नागिरी (उ.) तालुकाध्यक्षा सौ. स्नेहा चव्हाण, मा. नगरसेविका सौ. प्रणाली रायकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. सायली बेर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये यांनी केले.