बीडच्या ‘आका’वरून रणकंदन माजवणाऱ्या सुरेश धसांचाच ‘आका’ सुषमा अंधारेंनी काढला; नेमकं काय म्हणाल्या…

Spread the love

सुषमा अंधारे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, धस साहेब आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली होती. या प्रकरणाला १ महिना उलटला तरी सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाकडून जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. आज धाराशीवमधील मोर्चात मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. कारण या प्रकरणाचा मास्टरमाईंडड असलेला वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी सुरु आहे.त्यातच बीड प्रकरणामुळे आका शब्द एकदम चर्चेत आला. आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आका आणि आकांचा आका असा उल्लेख करत या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणला होता. मात्र आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आका आका करणाऱ्या सुरेश धसांचाच आका काढला आहे. यामुळे याच्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

बीडचं वाटोळं इथल्या पोलीस प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोप आमदार धस यांनी करत वारंवार आका आणि आकाचा आका हे शब्दप्रयोग केले. त्यांनी वाल्मीक कराडवर ३०२ कलम लावण्यासह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बीडच्या या प्रकरणावरुन आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, धस साहेब आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!

सुषमा अंधारेंचं ट्वीट –

“सन्मा. धससाहेब, पिकविमा, मल्टीस्टेट बँक घोटाळे, खून अपहरण खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आपण जंग जंग पछाडताय. आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर आता अनेकजण आका आणि आकांचे आका कोण,असा प्रश्न विचारत आहेत. त्याचबरोबर सुरेश धस यांचे आका कोण,असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. सुषमा अंधारेंच्या ट्विटवर आमदार धस काय उत्तर देतात, याची उत्सुकता आहे.

दरम्यान आमदार धस यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत खळबळ उडवून दिली होती. त्यांनी पुन्हा मुन्नी शब्द उच्चारत म्हटले की, मी कोणाला म्हणत आहे हे त्या मुन्नीला माहिती आहे. मुन्नी मला घाबरते. तिने माझ्याशी बोलावं पण ती बोलायला पुढं येत नाही. लहान पोरांना बोलायला पुढं करते. तसेच ही मुन्नी कोणी भगिनी नसून पुरुष आहे, नाहीतरी अजून राळ उडली असती, असं धस म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page