“तुम्हाला गरिबांची काय जाण असणार”, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला.”विरोधकांची मशाल हि क्रांती ची मशाल नसून घरोघरी आग लावण्याची मशाल आहे”, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोलीच्या सभेत केलं आहे.
दापोली/ प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीसाठी योगेश कदम यांच्या प्रचारार्थ दापोलीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला उपस्थिती दर्शवली होती. दापोली मतदार संघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आहे. महायुतीच्या सरकारने दापोलीचे आमदार योगेश कदम यांना 3हजार 500 कोटीपेक्षा जास्त विकासनिधी दिला आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 170हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहाणार नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. ज्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला, अशांना कोकणातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे शिंदे असंही म्हणाले की, तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या निवडणुकीत योगेश कदम यांना प्रचंड मताधिक्क्याने आमदार बनवा, असं आवाहन शिंदेंनी दापोलीकरांना केलं. मी त्यांना नामदार केल्याशिवाय राहाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्र डबघाईला जाईल असे म्हणणारे आता महिन्याला ३००० रुपये सरकार आल्यावर देऊ, असे जाहीरनाम्यात सांगतात. अशा ढोंगी लोकांना लाजा कशा वाटत नाही, असेही या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
“… तर आम्ही त्या नराधमांना फाशी देऊ”- मुख्यमंत्री शिंदे..
महाराष्ट्रामध्ये महिलांच्या केसाला धक्का लागला, तर आम्ही त्या नराधमाला फाशी दिल्याशिवाय राहाणार नसल्याचे वचनही त्यांनी या वेळी महिलांना दिले. सावत्र व कपटी भावांना आता महिला जोडा दाखवून महाविकास आघाडीला हद्दपार केल्याशिवाय राहाणार नाही. कोकणातील जनता साधी भोळी आहे त्यांनी एकदा का शब्द दिला की तो दिला . कोको कोला कंपनीचा उद्योग योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणात येऊ शकला. आम्ही धनुष्यबाण चोरला नाही, तर तो धनुष्यबाण तुम्ही गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवून वंदनिय बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
2019 ला सुध्दा योगेश कदम हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढले होते.आता 2024 मध्ये सुध्दा या चिन्हावर लढत आहेत, हे मतदारांनी लक्षात ठेवले पाहिजे. महायुतीच्या निशाणीवर लढणारा एकही उमेदवार पराभूत होणार नसल्याचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच करीत योगेश कदम यांनी दापोली येथील जागृत देवस्थान काळकाई मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम केले आहे. त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे त्या देवीचा आशीर्वाद योगेश कदम यांच्या पाठीशी सदैव राहिल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.योगेश कदम यांच्याकडे दापोली मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन आहे. तो पुढच्या पाच वर्षात या मिनी महाबळेश्वर दापोलीला पर्यटनाच्या नकाशावर आणल्याशिवाय राहाणार नाही.
काेयनेचे पाणी कोकणकरांना मिळणार ?..
कोयनेचे पाणी कोकणात खेळवायचे हे रामदासभाईंचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून त्याला केंद्राची मान्यताही मिळाली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला १० लाख कोटी रुपये दिले आहेत. आम्ही कोकण विकास प्राधिकरण मंडळ स्थापन केल्यामुळे कोकणाचा विकासाचा बॅकलॉग यापुढे लवकरच भरून निघेल. जे-जे कोकणाच्या विकासासाठी करायचे आहे, ते सर्व केल्याशिवाय महायुती सरकार गप्प बसणार नसल्याचेही एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले. कोकणातला तरुण यापुढे परदेशात जाऊ नये, म्हणून योगेश कदम उद्योग निर्मितीवर जास्त भर देत आहेत. असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
दापोलीकरांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, कोकणात चक्रीवादळ झाले त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. मात्र पहिली मदत ही मी पाठवली. लोकांच्या घरावर कौले मी बसवली. तुम्हाला गरिबांची काय जाण असणार, असा टोलाही उध्दव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी लगावला. उध्दव ठाकरे यांना फक्त बॅगा खोके पुरत नाहीत, तर कंटेनर लागतो, असे राज ठाकरे म्हणत असल्याचे त्यांनी या वेळी अधोरेखित केले. शिवसेना ही मोठी रामदास भाईसारख्या कार्यकर्त्यांमुळे झाली आहे आणि अशा अनेक कार्यकर्त्यांचा तुम्ही अपमान केला आहे.
ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली त्यांना कोकणवासीय थारा देणार नाहीत. विरोधकांची मशाल ही क्रांतीची नसून घराघरात आग लावण्याची आहे. रामदासभाई तुम्हाला आम्ही राजकारणातून कधीही निवृत्त होऊ देणार नाही. तुम्ही कोकणचे भाग्यविधाते आहात. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी एकाथा, आपला शत्रू ओळखा व त्याला चारी मुंड्या चित करा, त्यासाठी योगेश कदम यांना भरघोस मतांनी विजयी करा. मी विजय मिरवणुकीचा गुलाल उधळायला दापोलीत नक्की येईन, असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
हेवा वाटावा असं कोकण निर्माण करणार – सुनिल तटकरे..
यावेळी सभेत संवाद साधताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की , लोकसभेच्या वेडी निरोपकांकडून
चुकीचा प्रचार करण्यात आला मात्र आता तशी वस्तूस्थिती राहिलेली नाही यामुळे आता यावेळी सर्वजण महायुतीच्या बाजूने उभे राहतील. महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करण्याचे काम विरोधकांनी केला आहे. त्यामुळे जनता त्यांना मतदान करणार नाही. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा पूर्वी करण्यात आली. मात्र आता महायुतीच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला हेवा वाटावा असं कोकण निर्माण करण्यात येईल. असं आश्वासन त्यांनी दिलं.
रोजगार निर्मितीवर भर देऊ. – योगेश कदम..
आमदार योगेश कदम म्हणाले की, 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक सर्कस आली होती. यात अनेकांनी माकड उड्या मारल्या. मात्र आजच्या गर्दीमुळे जनता विकासाच्या सोबत आहे, हे सिद्ध झाले आहे. दापोलीत आपण साडेतीन हजार कोटींची विकासकामे केली. आपण भांडणे लावणाऱ्यांना बाहेर ठेवले आहे. आपण जो उठाव केला, त्यांच्यात आपण सर्वात तरुण आमदार होतो. आपल्याला निर्णय घेणे तेव्हा कठीण होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आश्वासन दिले की, मतदार संघाला आपण न्याय देऊ, यामुळे आपण तो निर्णय घेतला.
ठाकरे असाताना निधी मिळत नव्हता- – योगेश कदम..
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी निधी मिळत नव्हता. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणसाठी भरभरून निधी मिळायला लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी जणू पक्ष संपवण्याची सुपारीच घेतली होती, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. आजची सभा ही शिवसैनिकांची सभा आहे. गेल्या 5 वर्षात आपण मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले. पुढील 5 वर्षात आपण येथे रोजगार निर्मितीसाठी भर देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा उहापोह केला. केंद्र सरकार हे गरिबांचे रक्षण करणारे सरकार आहे. राज्यातही आता रामराज्य आले आहे. केंद्र व राज्यात एकाच विचारांचे सरकार येण्यासाठी येथील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची आवाहन त्यांनी केले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे किशोर देसाई व अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता दापोलीत महायुती विजयी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.