रत्नागिरी- प्रतिवर्षाप्रमाणे खल्वायन रत्नागिरी या संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ही मैफल मूळची नाशिकची व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली प्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर – कुलकर्णी हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग – नाट्यगीत गायनाने रंगणार आहे.
विशेष म्हणजे 1998 पासून गुढी पाडवा व दिवाळी पाडवा अशा दोन मराठी महत्त्वाच्या सणांना आयोजित केली जाणारी ही विशेष संगीत मैफल या वर्षीच्या गुढी पाडव्याला होणारी सुवर्ण महोत्सवी (५० वी) विशेष संगीत मैफल आहे. या मैफलीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. चे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
रागेश्री वैरागकर यांनी शास्त्रीय संगीतातील त्यांचे शिक्षण वडिल, गुरु जगदेव वैरागकर व काका पं. शंकरराव वैरागकर, गायत्री जोशी, स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांच्याकडे घेतले. त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार, ललित कला केंद्र, पुणे येथून एमए संगीत या पदव्या प्राप्त आहेत. भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव, स्वराहोत्र नाशिक, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र संगीत महोत्सव, चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक, पु. ल. देशपांडे कला अकादमी मुंबई, गोवा सांस्कृतिक मंडळ, गोवा, सुरसंगत पुणे या महोत्सवात त्यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम झाले आहेत. आकाशवाणी, सह्याद्री दूरदर्शन, श्रीरंग कलानिकेतन पुणे, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन आदी ठिकाणच्या स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. संगीतकार अनिल मोहिले, गानवर्धन पुणे, गौरव मराठी मनाचा अॅवॉर्ड, पं. राम माटे पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.
मैफलीस हार्मोनियम जगदेव वैरागकर, तबला प्रथमेश शहाणे, ऑर्गन संतोष आठवले, पखवाज कैलास दामले, तालवाद्य अद्वैत मोरे साथसंगत करणार आहेत. ही संगीत मैफल सुवर्ण महोत्सवीविशेष संगीत मैफल असल्यामुळे सर्व रसिकांना मैफल विनाशुल्क आहे. विशेष संगीत मैफलीचा आस्वाद सर्व रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेने अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे. दरम्यान, खल्वायन या संस्थेची ३०० वी मासिक संगीत सभा शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात रंगणार आहे. यात रत्नागिरीची सुकन्या व प्रख्यात गायिका अश्विनी भिडे – देशपांडे यांची पट्टशिष्या शमिका भिडे हिच्या गायनाने रंगणार आहे.