नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेवर भाष्य करावं या हेतूसाठी विरोधकांनी लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला होता. गेल्या तीन दिवसांपासून या अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून मणिपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या तीन दिवसांत या विषयावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केलं. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीचे दोन तासात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.प्रचंड टीका केली. त्यांनी विरोधकांची अक्षरश: खिल्ली उडवली. त्यानंतर मोदी मणिपूरच्या संवेदनशील विषयावर बोलू लागले. यावेळी त्यांनी मणिपूरच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं.
“हा देश विरोधी पक्षाकडून जास्त अपेक्षा करु शकत नाही. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मणिपूरच्या घटनेच्या चर्चेवर सहमती दर्शवली असती तर फक्त मणिपूर विषयावर विस्ताराच चर्चा होऊ शकली असती. मणिपूरच्या घटनेशी संबंधित प्रत्येक पैलूवर चर्चा होऊ शकली असती. त्यांनाही बरंच काही बोलण्याची संधी मिळू शकली असती. पण त्यांना चर्चेत रस नव्हतं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“अमित शाह यांनी काल विस्तार रुपात या घटनेची माहिती दिली तेव्हा देशाला सुद्धा आश्चर्य झालं की, या लोकांनी इतक्या अफवा पसरवल्या आहेत. अशी पापं या लोकांनी केली आहेत. त्यांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव आणला, अविश्वासाच्या प्रस्तावावर ते बोलले तर त्यांचं दायित्व आहे की, देशाच्या विश्वासाला प्रकट करा”, असं मोदी म्हणाले.
“आम्ही सांगितलं होतं की, मणिपूरच्या घटनेवर चर्चेसाठी या. गृहमंत्र्यांनी चिठ्ठी लिहून म्हटलं होतं. त्यांच्या विभागाशी संबंधित विषय आहे. पण विरोधकांकडे हिंमत आणि इच्छा नव्हती. पोटात पाप होतं. त्यांच्या पोटात दुखत होतं आणि डोकं फोडत होते”, अशी टीका मोदींनी केली.
“मणिपूरच्या स्थितीवर अमित शाह यांनी काल दोन तास संयमाने माहिती दिली. देशाच्या चिंता व्यक्त केली. देशाच्या जनतेला जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मणिपूरला विश्वास देण्याचा प्रयत्न होता. मणिपूरच्या समस्येसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न होता. पण विरोधकांनी फक्त राजकारण केलं”, असा आरोप मोदींनी केला.
“अमित शाह यांनी या विषयी विस्तारात सांगितलं. मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. कोर्टात काय होतंय ते आपण जाणतो. कोर्टाच्या निर्णयानंतर दोन मतप्रवाह बनले. त्यानंतर हिंसेच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक परिवारांचं नुकसान झालं. अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं. महिलांसोबत गंभीर अपराध झाले. हे अपराध अक्षम्य असे आहेत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरपूर प्रयत्न करत आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.
“मी देशाच्या सर्व नागरिकांना आश्वासित करु इच्छितो, ज्याप्रकारे प्रयत्न सुरु आहेत त्यानुसार आगामी काळात मणिपुरात शांतीचा सूर्य नक्कीच उगवेल. नव्या आत्मविश्वासाने पुढे जाईल. मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता, बघिणी आणि मुलींना सांगू इच्छितो देश तुमच्यासोबत आहे. हे सदन तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व मिळून या आव्हानावर मार्ग काढू. तिथे पुन्हा शांततेची स्थापना होईल. मी मणिपूरच्या लोकांना विश्वास देतो की, मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गाने पुढे जाईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.