“आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले आणि…”, शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं विधान

Spread the love

एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

संभाजीनगर ,मराठवाडा- आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण झाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी दिवस साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने ४५ हजार कोटींपेक्षा अधिकची विकासकामं मंजूर केल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले,

“काल (१६ सप्टेंबर) संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. आपल्या मराठवाड्यासाठी सरकार काय निर्णय घेणार? हे पाहण्यासाठी सर्वजण या बैठकीकडे डोळे लावून बसले होते. यातून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचं पर्व सुरू झालं आहे, असं मी नम्रपणे सांगू इच्छितो. कारण या बैठकीत आम्ही ४५ हजार कोटींपेक्षा जास्तीची विकासकामं मंजूर केली आहेत. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरुपी सुटका करायची आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रस्तावित आहे. मागच्या काळात ही योजना मंदावली. पण आता आपण यासाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.”

“मराठवाड्यात रस्तेही चांगले झाले पाहिजेत, यासाठी आपण शेकडो कोटी निधी दिला आहे. मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही. इथे पश्चिम महाराष्ट्रासारखी सधनता नाही. पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टाने या प्रदेशाला फुलवलं आहे. त्यांनी आपल्या घामाने सिंचन केलं आहे. पावसाने जरी ओढ दिली असली तरी शेतकऱ्याला जिथे नुकसान होईल, तिथे सरकारकडून मदत केली जाईल”, असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं.

“सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिल. गेल्या वर्षभरात आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले. सगळ्या अटी-शर्ती धाब्यावर बसवल्या. एनडीआरएफचे नियम बाजुला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली. एक रुपयात पीक विम्याची योजना आणली”, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page