
रत्नागिरी- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत पाणी विषयाशी निगडित सर्व क्षेत्रामध्ये अधिक प्रभावीपणे काम करावे, त्या अनुषंगाने कालवा साफसफाई, स्वच्छ सुंदर कार्यालय, जलपुनर्भरण याची कार्यवाही स्वत:पासून सुरु करावी, जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावीत असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, कार्यकारी अभियंता विवेक सोनार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यावेळी म्हणाले, 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हाधिकारी परिसरातील तीनही इमारतीमधील कार्यालयांना भेट द्यावी. त्याप्रमाणे स्वच्छ सुंदर माझे कार्यालय अंतर्गत आपल्या विभागाची सर्व कार्यालयांची साफ सफाई करावी.

ही साफसफाई दररोज होते का हे पहाणे आवश्यक आहे. माहिती अधिकारासह अन्य तक्रारींचे निरसन शुन्य संख्येत व्हायला हवे, त्याचबरोबर कालवा सफाई सारखे स्वत:हून काही कार्यक्रम घ्यावेत, प्रत्येकांनी जबाबदारीने कामे करावीत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन यावर कार्यक्रम करावा. पाणी वापर संस्था सक्षमीकरण यावर कार्यशाळा घ्यावी. शेतकरी पाणी वापर संस्था यांचा संवाद होतोय का त्यावरही भर द्यावा, असेही ते म्हणाले.