पंढरपूर l 20 मे- श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. हे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दि. 2 जूनपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. २ जूनपासून भाविकांच्या हस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापुर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री. विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली. काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी ४५ दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला आहे. काम पूर्णत्वास येत असून, संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे.