ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन ..

Spread the love

मुंबई- ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती. अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्यांनी साकारलेल्या पुलंच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून, न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.

अतुल परचुरे यांनी अनेक अभिनेते, दिग्दर्शक, कलाकारांसह काम केलं. वासूची सासु, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.

अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कॅन्सरवर मात करुनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही शारीरिक कॉम्प्लिकेशनला सामोरं जाव लागत होतं.  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. एक हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून हरपला आहे. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page