संगमेश्वरचे प्रथितयश डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये यांचे वृध्दापकाळाने निधन

Spread the love

जे डी पराडकर/संगमेश्वर- संगमेश्वर येथील जुन्या काळातील प्रथीतयश डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये ( ९२ ) यांचे २९ सप्टेंबर रोजी पहाटे संगमेश्वर येथील निवासस्थानी निधन झाले . गेले काही दिवस ते वृध्दापकाळामुळे आजारी होते .

संगमेश्वरसह नायरी आणि संगमेश्वर परिसरातील गावांमध्ये डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये यांनी जवळपास ६० वर्षांपेक्षा अधिककाळ वैद्यकीय सेवा दिली . ग्रामीण भागातून असंख्य रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत .

आजार कितीही त्रासदायक असला तरीही त्यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर रुग्णांना हमखास बरे वाटत असे असा त्यांचा नावलौकिक होता .

संगमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय येथेही त्यांनी १९५३ साली वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली होती . संगमेश्वर बाजारपेठत त्यांनी अनेक वर्षे दवाखाना चालवला .

तसेच संगमेश्वर येथेच धन्वंतरी या नावाने हॉस्पिटलही सुरु केले . पुढे महामार्गावरील हॉस्पिटल जवळचा बसथांबा ‘ मुळ्ये स्टॉप ‘ याच नावाने ओळखला जावू लागला .

आध्यात्मिक , कमालीचे अभ्यासू , वाचनाची जबरदस्त आवड , स्पष्ट वक्ते , रोगाचे अचूक परीक्षण अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या मध्ये दडलेली होती .

डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये यांच्या निर्मलचंद्र या मुलाने अमेरिकेत जावून नावलौकिक मिळवला तर सुशिल याने एम .एस. होत संगमेश्वर , लांजा आणि रत्नागिरी येथे मोठी रुग्णालये उभारुन वैद्यकीय व्यवसायाचा विस्तार केला . डॉक्टर सुशील यांच्या पत्नी सौ . मीरा या देखील डॉक्टर असून आता त्यांची कन्या पूर्वा ही देखील एम .बी .बी. एस .झाली आहे . डॉक्टर सुशील हे आपल्या वडिलांचा वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे चालवीत आहेत .

डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळ्ये ( ९२ ) हे गेले काही दिवस वृध्दापकाळाने आजारी होते . गेले दोन दिवस त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि आज पहाटे २ : ३० च्या दरम्याने त्यांचे निधन झाले . …

डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळे यांचे मूळ गाव उजगाव येथील खोत म्हणून त्यांच्यावर गावची जबाबदारी होती .

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उजगावसह संगमेश्वर परिसरातील असंख्य मंडळी , विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले . डॉक्टर वसंत मुळ्ये यांच्यावर माभळे येथील स्मशानभूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .

त्यांच्या पश्चात निसर्गोपचार तज्ञ पत्नी सुमित्रा , तीन मुलगे , दोन मुली , सुन , नातवंडे असा मोठा परिवार आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page