पुणे- पुण्यामधील नाना पेठे येथे रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये वनराज यांच्यावर उपचार सुरु होते. वनराज यांच्या मृत्यूच्या बातमीला पुण्याचे सह-पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. गोळीबार केल्यानंतर वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार वनराज आंदेकर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर पिस्तुलातून ५ ते ६ गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आंदेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसर सील केला. ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला त्या ठिकाणी पाच ते सहा राऊंड पोलिसांना सापडले. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकांची स्थापना केली आहे. तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी ती रवाना करण्यात आली आहे. वनराज यांच्यावरील गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही.
पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की, रविवारी रात्री दोनजण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमची पथके रवाना करण्यात आली आहेत.