मुंबई :- कोकण रेल्वे मार्गावर एक नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रकाप्रमाणे गाड्यांचा वेग वाढणार असून नवे वेळापत्रक एक नोव्हेंबर ते ९ जून २०२४ पर्यंत लागू होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात मिनी हायस्पिड असलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही मुंबईहून मडगावला अवघ्या ७ तास ४५ मिनिटात पोहचणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर २००१ मध्ये मोठा अपघात झाल्यानंतर रेल्वेचे वेळापत्रक दोन टप्प्यांत चालवले जाते. पहिल्या टप्प्यात एक नोव्हेंबर ते ९ जून हा उन्हाळी हंगामातील वेळापत्रक नियोजनाचा कालावधी असतो तर पावसाळी हंगामासाठी वेगावर मर्यादा ठेवून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये गाड्यांचा वेग निश्चित केला जातो.पावसाळी हंगामामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने गाड्यांचा वेग ताशी ५० ते ८० किलोमीटर असा असतो. मात्र, आता उन्हाळ्यामध्ये हा वेग कमालीचा वाढणार असून गाड्या १०० ते ११० किमी वेगाने धावणार आहेत. यामुळे या मार्गावर वेगवान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तेजस एक्सप्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे.जनशताब्दी एक्सप्रेस ही ९ तास २० मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. पावसाळी हंगामामध्ये गाड्यांचे वेळापत्रक सातत्याने विस्कळीत असते. मात्र, हे वेळापत्रक आता उन्हाळी हंगामात नियमित होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस मुंबई येथून रात्री ११. १७ वाजता सुटून मडगावला सकाळी ९.४५ वाजता पोहोचणार आहे.परतीसाठी मडगाव येथून सायंकाळी ७.४० वाजता सुटून मुंबई सीएसटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई येथून पहाटे ५.१८ वाजात सुटून मडगावला दुपारी २.३० मिनिटांनी पोचणार आहे. परतीसाठी दुपारी ३.०५ मिनिटांनी मडगाव येथील सुटून मुंबईला रात्री ११.३० वाजता पोचणार आहे. मिनी हाय स्पीड असलेली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई येथून पहाटे ५.२५ वाजता सुटून मडगावला दुपारी १.१० मिनिटांनी पोहोचेल.
परतीसाठी मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटून मुंबईला रात्री १०.२५ वाजता पोहचणार आहे. ही गाडी दर आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सुटणार आहे. शुक्रवारी ही गाडी बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून डबलडेकर गाडी बंद ठेवण्यात आली असून त्या ऐवजी एलटीटी मडगाव ही विशेष गाडी सोडण्यात येते.ही गाडी एलटीटी येथून दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री एक वाजून ४५ मिनिटांनी सुटून मडगावला सकाळी साडेअकरा वाजता पोहोचणार आहे. परतीसाठी त्याच दिवशी मडगाव येथून दुपारी साडेबारा वाजता सुटून एलटीटीला रात्री ११.३५ ला पोहोचणार आहे. परतीच्या वेळी कणकवलीत दुपारी ३.१५ मिनिटांनी दाखल होईल.
काही रेल्वे गाड्यांच्या वेळा :
मुंबईहून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुटणार असून मडगावला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोचणार आहे. मुंबईकडे जाताना मडगाव येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून सावंतवाडीला १०.४०, कुडाळ ११, सिंधुदुर्गनगरी ११.१५, कणकवली ११.३० तर वैभववाडीला ११.५६, रत्नागिरी येथे दुपारी २.२५ तर दादरला रात्री ९.०७ वाजता पोहचणार आहे.तुतारी एक्सप्रेस दादर येथून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटून सावंतवाडीला सकाळी १०.४५ वाजात पोहचणार आहे. परतीसाठी सावंतवाडी येथून रात्री ८ वाजता सुटून कणकवली ८.४५, नांदगाव ८.५८ वाजात, वैभववाडी ९.१२ वाजता पोहोचेल. ही गाडी दादर येथे सकाळी ७.४० पोहोचणार आहे.