“वंदे भारत एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतिक.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

Spread the love

मुंबई- रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला व एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गाचे आणि मालाडमधील कुरार गांव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील रेल्वे वाहतूक ही आपल्या प्रगतीची जीवनरेखा आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी, विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आतापर्यंत देशात एकूण १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. देशाला आज नववी आणि दहावी ‘वंदे भारत’ ट्रेन समर्पित करण्यात आली आहे.

नाशिक आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांना जाण्यासाठी तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सिध्देश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ येथे भाविकांना जाता येणार आहे. शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी भाविकांचा प्रवास जलद होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे नव्या भारताच्या विश्वासाचा संकल्प असून आधुनिक भारताची प्रतिमा निर्माण करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या १० ट्रेन सुरू झाल्या असून त्यामुळे १७ राज्यात १०८ जिल्हे जोडले गेले असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

मुंबई मध्ये पूर्व – पश्चिम उपनगरांना जोडणारे प्रकल्प सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे. रेल्वे, नवीन विमानतळ आणि बंदरे विकसित करण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वे साठी अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी विशेष लाभ देण्यात आला आहे. आयकर मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page