चौथ्या टप्प्यात ८६७ ची यादी जाहीर.
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या चौथ्या टप्प्यात ८६७ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये विकल्प भरताना पहिल्या क्रमांकावरील शाळेत बदली मिळालेले ४८४ शिक्षक असून एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५६ टक्के आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरवातीला धिम्या गतीने सुरू होती; मात्र ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत संवर्ग एक ते चारच्या बदल्यांची प्रक्रिया वेगाने झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी चौथ्या संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. संवर्ग ४ मध्ये म्हणजे बदलीप्राप्त शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये ८७८ शिक्षकांचा समावेश होता. सर्वच शिक्षकांनी बदलीसाठी शाळा विकल्प भरल्यामुळे कुणाला कोणती शाळा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकूण यादीपैकी ८६७ शिक्षकांच्या बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ११ शिक्षकांना विकल्प भरूनही शाळा मिळालेली नाही. ते विस्थापित राहिल्यामुळे पुढील टप्प्यासाठी त्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे. विस्थापितांसाठी रँडम राऊंड ठेवण्यात आला आहे. त्यामध्येही संधी मिळाली नाही तर शिक्षण विभाग देईल त्या शाळेवर शिक्षकांची नियुक्ती केली जाऊ शकते.
बदली पात्र असलेल्या टप्प्यातील शिक्षकांमध्ये पहिल्याच पसंतीची शाळा मिळालेले ४८४ शिक्षक असून हे प्रमाण ५६ टक्के आहे. १ ते ५ क्रमांकांच्या शाळा मिळालेल्यांची संख्या ७३८ असून हे प्रमाण ८२.३६ टक्के आहे. ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ज्या शिक्षकांना पहिल्या पसंतीची शाळा मिळालेली नाही त्यांना अपेक्षित शाळेच्या आजुबाजूची शाळा देण्यात आली आहे. त्यामुळे समाधानी असलेल्या शिक्षकांचा टक्का वाढला आहे. आत्तापर्यंत चार संवर्गातील मिळून १ हजार ५१३ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत प्रक्रियेत बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या कामाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून बदलीसाठी विशेष कक्ष बनवण्यात आला होता. त्यामुळे सर्व माहिती वेळेत भरणे शक्य झाले होते.
बदलीच्या प्रक्रियेत विस्थापित होणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी ९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. विस्थापितमध्ये ११ शिक्षक असून त्यांना अर्ज भरणे अत्यावश्यक आहे. त्यांची बदली प्रक्रिया चार दिवसात होईल. शेवटच्या टप्प्यात रिक्त असणाऱ्या दुर्गम भागातील सर्व शाळांचा समावेश राहील. शिक्षक बदलीपात्र नाहीत; परंतु सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेले आहेत. त्यांची एकत्रित यादी करून जेवढ्या शाळा शिल्लक असतील तेथे नियुक्ती दिली जाणार आहे.