मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह (वय-६५) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांना अहमदाबादहून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अमित शाह रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. शाह यांनी बहिणीवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात जाऊन बहिणीच्या तब्येतीची विचारपूस केली. शाह आणि मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमध्ये येताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. शाह हे जवळपास २ तास हॉस्पिटलमध्ये बहिणीसोबत होते. शाह यांचा खासगी दौरा असल्याने ते इतर कुणालाही न भेटता मुंबईहून पुन्हा दिल्लीला रवाना झाले.
आज त्यांच्या बहिणीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. राजेश्वरीबेन शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.