मुंबई :- मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आज ठाकरे गटातर्फे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. इकडे निष्ठावंतांची सभा आहे, तर तिकडे गारद्यांची टोळी अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाच्या वर्धापन दिनावर टीका केली.
इकडे निष्ठावंतांची गर्दी आहे तर तिकडे गारद्यांची गर्दी आहे अशी खोचक टीका शिंदे गटाच्या वर्धापनदिनावर करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, म्हणे सूर्यावर थुंकू नका, अरे कोणता सूर्य ? हा सूर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही ? असा सवाल त्यांनी केला. मणीपूर पेटलं आहे आणि मोदी अमेरिकेत निघालेत. मणीपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे लक्ष द्या, असे ठाकरेंनी भाजपला सुनावले.
कोव्हिडची लस मोदींनी तयार केली असे म्हणाल्याची फडणवीस यांचा ऑडिओ या मेळाव्यात त्यांनी ऐकवला. लस बनवली असेल तर आता ब्रम्हांड देखील चालवू शकाल. भाजपचे सगळे एकापेक्षा एक अवली आहेत, लवली कोणच नाही अशी मिश्किल टिपण्णी ठाकरेंनी भाजपवर केली. हिंमत असेल तर देशातील विरोधक संपवण्यापेक्षा देशाचे विरोधक संपवा. माझ्या देशातील एक भूभाग पेटला आहे. त्या मणिपूरवर लक्ष द्या. असं आवाहन ठाकरेंनी यावेळी केली.
गुवाहाटीला गेला तर काय पहाल, रेडा कुठे कापायचा, दिल्लीत मुजरा कसा घालायचा हे यांच्याकडून शिका. या गारद्यांची टोळी म्हणजे वसुली टोळी आहे. जाहिरातींवरचे पैसे सामान्य माणसावर खर्च करा असे आवाहन ठाकरेंनी सत्ताधारी पक्षाला केले.