रत्नागिरी- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडूनd उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी जि. प. अध्यक्ष उदय बने यांनी अखेर आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असणाऱ्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम बसला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने हे इच्छुक उमेदवार होते. त्यातील ज्येष्ठ नेते उदय बने हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र भाजपचे गेले ३९ वर्ष प्रामाणिकपणे काम करणारे माजी आमदार बाळ माने यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बाळ माने यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. हा प्रकार उदय बने यांच्या जिव्हारी लागल्याने गेले काही दिवस ते शांत होते; मात्र ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.
बने हे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील अशी चर्चा काही ठिकाणी ऐकू येत होती; मात्र आमदार राजन साळवी यांनी उदय बने हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून आजपर्यंत शिवसेनेने त्यांना भरभरून दिले आहे तसेच उदय बने यांनीही रत्नागिरी शिवसेना रुजवण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उदय बने यांचा योग्य तो सन्मान करतील, अशी अपेक्षा कालच (२८ ऑक्टोबर) व्यक्त केली होती.
मात्र आज उदय बने यांनी अपक्ष अर्ज भरल्याने आता ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्त्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. काही कार्यकर्ते निष्ठावंत उदय बने यांना उमेदवारी न दिल्याने नाराज असल्याचे दिसत असून काही कार्यकर्ते पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून बाळ माने यांच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. उदय बने हे निवडणूक लढवणार की अर्ज मागे घेणार? हे ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.