चिपळूण:- सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यावर नाशिक येथील वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे, तर तिन्ही ठिकाणची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी गुजरात ईडी कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर ही धडक कारवाई केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे चिपळुणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन कात व्यावसायिक अजून पसार असून, त्यांच्यावर वन विभागाकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नाशिक हवेत येथे विनापरवाना खैरतोड करून येथील खैराचे लाकूड सावर्डेमध्ये आणल्याचा नाशिक वनविभागाचा संशय आहे. त्यानुसार मंगळवारी दिवसभर छापा टाकण्यात आला. दहिवली सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खैराचे लाकूड तसेच तयार केलेला ज्यूस आणि कात वनविभागाने जप्त केला आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून खैरसाठा जप्त केला होता. याप्रकरणात सावर्डे येथील दोघांना अटक केली होती. दहशतवादी संघटनेची संबंध ठेवल्याचा संशय या दोघांवर होता. यातून ही कारवाई झाली होती.
आता पुन्हा एकदा नाशिक वनविभागाने कारवाई केल्यानंतर कात उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. हा छापा गुजरात येथील ईडीच्या आदेशाने झाल्याचे नाशिक येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणते वळण घेणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात चिपळूणच्या विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबाबत फारशी माहिती नाही. ही कारवाई नाशिक वनविभागाने केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे याबाबतची फारशी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात उलटसुलट चर्चा सुरू आहे.