
प्रतिनिधी – पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांची प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे. या तपासणीत दापोली तालुक्यात दोन पाकिस्तानी महिला आढळून आल्या आहेत.
मात्र, या दोन्ही महिलांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी भारतीय नागरिकांशी विवाह केला असून, त्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असल्याची माहिती दापोली पोलीस ठाण्यातून समोर आली आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दापोली तालुक्यात माहिती घेतली असता, दापोली शहरात एक आणि हर्णे येथे एक अशा दोन पाकिस्तानी महिलांची माहिती मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुसा नामक पाकिस्तानी महिलेने शाहनवाज बटे यांच्याशी विवाह केला असून, त्या २०१३ पासून दापोली शहरात राहत आहेत. तर दुसरी महिला आसियाबानू हाजी अन्वर अकबानी या हर्णे येथे आपल्या पतीसोबत वास्तव्यास आहेत.
आसियाबानू यांनी त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्जही केला असल्याचे समजते.
दापोलीप्रमाणेच देशभरात अनेक पाकिस्तानी महिलांनी भारतीय पुरुषांशी विवाह केला असून, त्या अनेक वर्षांपासून सुखाने संसार करत आहेत. प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासणीत या महिलांची माहिती समोर आली असली, तरी त्यांचे भारतीय नागरिकांशी झालेले विवाह आणि त्यांचे येथील दीर्घकालीन वास्तव्य यामुळे त्यांना देश सोडण्यासंदर्भात कोणते निर्देश मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.