ठाणे; प्रतिनिधी (निलेश घाग) एमएमआरडीएला ठाण्यात दोन मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा देण्यात येणार आहे. नव्याने अधिग्रहित केलेल्या जमिनीमुळे मुंबईतील नागरिकांसाठी मेट्रो ट्रेनचे कार्यक्षम संचालन, देखभाल आणि दुरुस्ती सुलभ होईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.
मुंबई मेट्रो मार्ग- १२ च्या डेपो साठी ठाणे जिल्ह्यातील निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जमीन शासनाने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. मौजे निळजेपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे येथील सदर जमीन विनामूल्य असून भोगवटादार म्हणून एमएमआरडीएला देण्याचे आदेश जिल्हाधकाऱ्यांमार्फत निर्गमित करण्यात आलेले आहेत.त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी मौजे डोंगरी येथील जागेचा आगाऊ ताबा देणेस मान्यता देण्यात आलेली होती, त्यानुसार मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी देखील मौजे डोंगरी येथील ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी दिला आहे. या दोन्ही जागांमुळे ठाणे जिल्ह्यात दोन महत्वपूर्ण मेट्रो मार्गिकांसाठीचे डेपो आता उभारण्यात येणार आहेत जिथे मेट्रो गाड्या विसावू शकतील.
राज्य शासनाची भूमिका ठरली महत्त्वाची एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी ही जमिनी विनामूल्य हस्तांतरित केलेली आहे. या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारचा सक्रिय पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे.’मेट्रो प्रकल्पांसाठी दोन्ही जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. सध्या सर्वच मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून ही कामे लवकरच पूर्ण होतील.मेट्रो डेपो हे मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीतील अविभाज्य घटक असतो, जो प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे सुव्यवस्थित संचलन करणे, गाड्यांची देखभाल दुरूस्ती या साठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यासोबतच राज्य शासनाच्या मदतीने उर्वरित प्रस्तावित असलेल्या सर्व मेट्रो डेपोसाठीच्या जागा हस्तांतरित करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमएमआरडीए
जाहिरात