रत्नागिरी :- हप्ते न भरणाऱ्या कर्जदाराला मारहाण करणाऱ्या चौघांपैकी दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कुटेकर (रा. झाडगाव, रत्नागिरी), प्रवीण आलीम (रा. शिरगाव, रत्नागिरी) अशी अटक दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर शहर पोलीसांनी या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मिरजोळे येथील अजय पाटील यांनी बालाजी फायनान्सकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे ३ ते ४ हप्ते चुकल्याने फायनान्स कंपनीची कर्ज वसुली करणारे राजा कुटेकर कर्जदाराला फायनान्स कंपनीच्या ऑफीसला घेऊन आले. याठिकाणी कुटेकर याच्यासह फायनान्स कंपनीची कर्ज वसुली करणारे प्रविण आलीम, शुभम साळवी, शुभम सावंत यांनी मारहाण करुन खिशातील पैसे, मोबाईल काढून
घेतल्याची तक्रार अभय पाटील यांनी शहर पोलिसांकडे केली होती.
गुन्ह्यातील चारही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यातील राजू कुटेकर, प्रविण आलीम यांच्या अर्जावर सुनावणी होऊन त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शहर पोलीसांनी दोघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.