शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं होतं,ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सींचे गंभीर आरोप

Spread the love

नवी दिल्ली- ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारने शेतकरी आंदोलना दरम्यान ट्विटरला धमकावलं होतं असा गंभीर आरोप केला आहे. तसंच जॅक डोर्सी यांनी असाही दावा केला आहे की ट्विटरला असंही सांगण्यात आलं होतं की मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करा. आम्ही असं केलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु आणि कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करु अशी धमकीच आम्हाला देण्यात आली होती. सोमवारी युट्यूब चॅनल ब्रेकिंग पॉईंटला दिलेल्या मुलाखतीत जॅक डोर्सी यांनी हा दावा केला आहे.

या मुलाखतीत जॅक डोर्सींना शक्तीशाली लोकांविषयी प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भारताचं नाव घेतलं नाही पण या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, ‘शेतकरी आंदोलना दरम्यान आम्हाला धमक्या देण्यात आल्या होत्या. जगभरातले अनेक शक्तीशाली लोक तुमच्याकडे येतात. विविध प्रकारच्या मागण्या करतात. मी उदाहरण देईन ते भारताचंच. भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते.vत्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. तसं केलं नसतं तर आमची कार्यालयं बंद करण्यात आली असती, तसंच कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. हे भारतात घडलं आहे. जो एक लोकशाही देश आहे’, असंही डोर्सी यांनी म्हटलं आहे. प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांचं धोरण निष्काळजी आहे असं म्हणत डोर्सी यांनी त्यांच्यावरही टीका केली. एलॉन मस्क हे आमचे क्रमांक एकचे युजर होते आणि ते चांगले ग्राहकही होते. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांचं धोरण निष्काळजीपणाचं आहे असंही डोर्सी यांनी म्हटलंय.

जॅक डोर्सी यांनी ट्विटर बोर्डाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान कसा दबाव आणला होता त्याची माहिती दिली आहे. अनेक ट्विटर हँडल्स ब्लॉक करण्यासाठी ट्विटरवर दबाव होता असं त्यांनी सांगितलं आहे. भारतात शेतकरी आंदोलन झालं होतं. कृषी कायदे रद्द करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी पाच महिन्यांहून अधिक काळ बसले होते. शेतकऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या सरतेशेवटी सरकारने कायदे मागे घेतले आणि हे आंदोलन संपलं. आता याच आंदोलनाबाबत जॅक डोर्सी यांनी धक्कादायक दावे केले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page