मुंबई : पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पातील सर्वाधिक लांब बोगद्याचे भूमिगत खोदकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत तिन्ही बोगद्याचे काम ७२ टक्के झाले असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अंतर्गत पनवेल कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके आहेत.
याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे होणार आहेत. ३.१२ किमीचे तीन रेल्वे बोगदे असणार आहेत.
तसेच या रेल्वेमार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल असणार आहेत. या सर्वांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्गिका उभारण्यासाठी २ हजार ८१२ कोटी रुपये खर्च येणार आहे.
नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे :
आतापर्यंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर एकूण ३,१४४ मीटर लांबीचे नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येत आहेत. या बोगद्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.
यापैकी वावर्ले बोगदा हा २,६२५ मीटर लांबीचा आहे. आतापर्यंत २,६२५ मीटरपैकी २,०३८ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर असून आतापर्यंत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. तर किरवली बोगदा ३०० मीटर लांबीचा असून ३०० मीटरपैकी २३४ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले.
या बोगद्याच्या आतील रेल्वे मार्ग हा गिट्टीरहीत असणार आहे. बोगदा नियंत्रण यंत्रणा, उत्तम प्रकाशव्यवस्था, व्हेंटिलेशन यंत्रणेसारख्या सुविधेने हा भूमिगत रेल्वे मार्ग सुसज्ज असणार आहे.- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळ
जाहिरात