चिपळूण : उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीच्या निर्घृण हत्याप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्याबाबत काढण्यात आलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या मोर्चात एका विशिष्ट समाजातील महिला शिरली आणि या महिलेने अर्वाच्य भाषेत अश्लील शिवीगाळ करीत या मोर्चाला गालबोट लावल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले. यानंतर मोर्चेकरांनी येथील पोलीस ठाण्यात धडक देऊन ‘त्या’ महिलेवर कडक कारवाईची मागणी केली. यानुसार ‘त्या’ महिलेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान उद्या शुक्रवारी चिपळूण बंदची हाक व्यापाऱ्यांनी दिली आहे. केवळ मेडिकल सुरु रहातील.
या मोर्चादरम्यान मान्यवरांची भाषणे सुरू असतानाच एका समाजातील महिला मोर्चात घुसली आणि तिने अर्वाचे भाषेत अश्लील शिवीगाळ करीत मोर्चाला गालबोट लावले. या प्रकाराने तणाव निर्माण झाला आणि मोर्चेकरांनी या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मोर्चेकरांशी संवाद साधून मोर्चेकरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर या प्रकरणी ‘त्या’ महिले विरोधात गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली.