महाड : महाड एमआयडीसी येथे प्रसोल कंपनीत गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात विषारी वायू गळती झाली. या अपघातात परवेज ठाकर सिंग (१९ वर्षे) या युवा कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पोलादपुरचे पंकज डोळस (२९), नाते येथील संतोष मोरे (२४), मध्य प्रदेश येथील इंद्रजित पटेल (२३) व परवेज ठाकर (२३) हे जखमी झाले आहेत.
अपघात झाला त्यावेळी कंपनीमध्ये तब्बल ८७ कामगार हजर होते. सद्यस्थितीत कंपनी बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती महाड तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी विषारी वायू हवेत पसरल्याने कंपनीतील कामगार जखमी झाले आहेत. नाइट शिफ्टला असलेले पाच कामगार या विषारी वायूमुळे जागीच बेशुद्ध पडले. त्यापैकी एका परप्रांतीय कामगाराचा अत्यवस्थ होऊन मृत्यू झाला. आणखी एका कामगाराची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी काळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती आंधळे यांनी दाखल होत कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता कंपनीच्या गेट बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील कंपनी कामगारांमध्ये घबराट पसरली असून येथील स्थानिक नागरिकही भीतीच्या छायेखाली आहेत. घटनास्थळी महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी भेट दिली आहे