
कर्जत | माथेरान शहरात येणार्या पर्यटकांची होणारी फसवणूक, आर्थिक लूट थांबावी, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, यासाठी माथेरान पर्यटन बचाव समिती काम करत आहे मात्र या समितीला प्रशासन सहकार्य करीत नसल्याने अखेर आज, १८ मार्चपासून माथेरान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात माथेरानमधील सर्व व्यवसाय बंद असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.माथेरान शहरातील प्रवेशद्वार येथे एजंटकडून पर्यटकांची फसवणूक केली जाते. यामध्ये माथेरान शहराची चुकीची माहिती देणे, पर्यटकांची आर्थिक फसवणूक करणे आदी प्रकार घडत असतात. तसेच माथेरान शहरात येणार्या पर्यटकांचा प्रवास सुखरुप व आनंदी व्हावा, यासाठी शासनाची सीसीटीव्ही कॅमेरे, दरपत्रक, माहिती केंद्र असावीत, अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव समितीची होती.
यासाठी माथेरान पर्यटन बचाव समिती गेले महिनाभर प्रशासनासोबत चर्चा करीत होती. त्यात माथेरान पर्यटन बचाव समिती आणि प्रशासन यांच्यात दोन बैठका झाल्या होत्या. शहराची बदनामी करून पर्यटकांची दिशाभूल करणार्यांवर कारवाई करावी अन्यथा १८ मार्चपासून माथेरान हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद ठेवले जाईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी प्रशासनाने पर्यटन बचाव समितीसोबत सोमवारी, १७ मार्च रोजी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत प्रशासनाकडून माथेरानचे महसूल अधीक्षक अभयसिंह ठाकूर, पोलिस अधिकारी अनिल सोनोने, वन अधिकारी उमेश जंगम आणि पालिका मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी माथेरान पर्यटन बचाव समितीकडून सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि व्यापारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.यावेळी बहुसंख्य सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. दस्तुरी प्रवेशद्वार येथे पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. वन जमिनीमध्ये घोडे बांधले जातात.
त्यामुळे झाडे तुटली जात असताना वन विभाग शांत आहे. पार्किंग हद्दीत प्रवासी घोडे नेण्याचे बंद झालेले नाही आणि नगरपरिषदेने घोडे, हातरिक्षा, हमाल यांचे निश्चित केलेले दरफलक लावले नाहीत. यामुळे पर्यटन बचाव समिती संतप्त झाली असून शहराचे पर्यटन वाचावे, यासाठी प्रशासनाला कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचे दिसून येत असल्याने आजपासून माथेरान बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय माथेरान पर्यटन बचाव समितीने घेतला.
फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने काय करावे..?…
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणार्या पर्यटकांची फसवणूक थांबावी आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्यात माथेरान दस्तुरी प्रवेशद्वार येथे असलेल्या टॅक्सी स्टँड पासून लोखंडी डॉमपर्यंत एकही एजंट, घोडेवाले, हमाल, रिक्षा चालक यांनी येऊ नये.
पर्यटकांनी प्रवासी वाहन कर भरल्यावर डोममध्ये शेवटी माथेरान पालिकेचे माहिती केंद्र विविध प्रकारचे दरपत्रक असावे आणि त्यापुढे घोडे, रिक्षा, हातरिक्षा आणि हमाल यांचे प्रीपेड स्टॉल असावेत. जेणेकरुन पर्यटकांना रितसर माहिती मिळेल आणि फसवणूक होणार नाही.
असा असेल बंद…
माथेरान बंद काळात कोणतेही व्यवहार सुरु असणार नाहीत. पर्यटकांनी आपली गैरसोय होईल त्यासाठी आधी माहिती घेऊन माथेरान येण्याचे नियोजन करावे. आज, १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व नागरिक, व्यापारी यांनी एकत्र जमाणार असून श्रीराम चौकात सर्वांची बैठक होईल आणि पुढील निर्णय होतील.
काही एजंटकडून माथेरानची चुकीची माहिती दिली जाते. त्यामुळे पर्यटक अर्ध्या दिवसानी घरी परतण्यास निघतो. माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारची शेती नसल्याने येथील पर्यटन बहरावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. – अजय सावंत, माजी नगराध्यक्ष, माथेरान नगरपरिषद