मशाल ही आग आहे, आगीशी खेळू नका, नाहीतर…; ठाकरेंचा भाजपावर घणाघात

Spread the love

मुंबई :– तुमच्याकडे आलेल्या सगळ्यांना क्लीनचीट देताय मग लॉन्ड्री का काढत नाही. माझ्या शिवसैनिकांना छळायचे. किशोरीताई, संजय राऊत यांना छळायचे. तुमचेही दिवस येतील. तुम्हालाही आत जावे लागेल. मशाल ही आग आहे. या आगीशी खेळू नका, थोडे दिवस राहिलेत आराम करा. हेलिकॉप्टरने शेतात जा असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाला नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. आता बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो लावावा लागतोय. बाळासाहेब ठाकरे एकमेव हिंदुह्दयसम्राट झाले. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आहात. स्वातंत्र्य लढ्यात चले जावमध्ये भाजपा आणि त्यांची मातृसंस्थाही नव्हती. बंगालच्या फाळणीला श्यामप्रसाद मुखर्जी यांनी पाठिंबा दिला होता. कोणत्या विचारातून तुमचा पक्ष जन्माला आलाय. तुम्हाला माझे वडील चोरावे लागतात. हे वैचारिक दारिद्र्य आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केली नव्हती अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ‘होऊ दे चर्चा’ या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
त्याचसोबत आम्ही भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले बोलले जाते. भाजपा म्हणून हिंदुत्व नाही. जालनातील ज्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्या माताभगिनीकडून राखी बांधून घ्या. ‘सरकार आपल्या दारी’ या लोकांना दारात उभे करू नका हाकलून द्या. अडीच वर्षाच्या काळात एकही दंगल होऊ दिली नाही. आंदोलकांशी चर्चा का केली नाही. आंदोलनाला बसलेत त्यांच्याशी बोलायला वेळ नसेल तर सरकार चाटायचे आहे का ? आजपर्यंत मराठा आंदोलने निघाली, मोर्चे काढले पण कुठेही शांतता भंग केली नाही. गेल्या दीड वर्षात मराठा आरक्षण का दिले नाही ? असा सवाल त्यांनी केला.
तसेच कोविड काळात ज्यांनी जीवावर उदार होऊन काम केले त्यांनाच तुम्ही गुन्हेगार ठरवत आहात. मोदींनी लस शोधली नसती तर असं म्हणायचे असेल तर ते चंद्रावर, सूर्यावरही घर घेऊ शकतात. गो कोरोना गो म्हणून थाळ्या वाजवत बसले होते. तुम्ही काहीही मदत केली नव्हती. कोरोना लस विकत घेण्याचीही आमची तयारी होती. सर्वाधिक लसीकरण करणारे राज्य महाराष्ट्र होते . आता त्यात भ्रष्टाचार काढत आहेत . मग तुमचा भ्रष्टाचार कधी काढणार असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
दरम्यान, गौरी गणपती आले तरी मुंबई – गोवा महामार्गावर खड्डे अजून भरले नाहीत . हा पैसा कुणाच्या खिशातून जातोय. कित्येक वर्षांनी एनडीए नावाचा प्रकार आहे कळला. इंडिया आघाडी झाल्यानंतर एनडीएची आठवण झाली. आम्ही सोबत होतो, जे वचन मला दिले होते, माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन शिवतीर्थावर बोललो होतो. ते खोटे ठरवले. अडीच वर्ष तुमचा, अडीच वर्ष आमचा मुख्यमंत्री झाला असता तर ही फोडाफोडी करायची गरज नव्हती असंही ठाकरे म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page