पुणे ,01 ऑगस्ट-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पोलिसांचा मोठा फौजफाटा पुण्यात दाखल झाला आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांसह सुमारे २३ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील सुमारे साडे पाच हजार पोलिसांच्या बरोबरीने हा अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी असणार आहे. शाळा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे शहर वाहतूक विभागाचे उप-आयुक्त यांनी पुणे शहरातील विविध रस्त्यांवर आज सकाळी ६ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतुक बंदी केलेली आहे.
देशातील सुरक्षा विभागांशी संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी एक आठवड्यापासून पुणे शहरात ठाण मांडून आहेत. पोलिसांच्या नांदेड आणि नागपूर परिक्षेत्राव्यतिरिक्त अन्य सर्व विभागांमधून पोलीस अधिकारी पुण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून दोन सहायक पोलीस आयुक्त, ११ वरिष्ठ निरीक्षक, ५० सहायक निरीक्षक/फौजदार, ५०० कर्मचारी पुण्यात बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस दलातून एक अतिरिक्त अधीक्षक, दोन उप-अधीक्षक, पाच निरीक्षक आणि १०० कर्मचारी बंदोबस्तासाठी शहरात असणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सर परशुरामभाऊ कॉलेज (एसपी कॉलेज) परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफा ज्या रस्त्याने जाईल तेथे सर्वत्र बांबूचे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.