१६ ऑक्टोबर/कोल्हापूर– आज १६ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध द्वितीया आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई महागौरी रूपात सजली आहे.
जगन्मातेच्या नवदुर्गा स्वरूपापैकी आठव्या स्वरूपाची दुर्गा म्हणजे भगवती महागौरी. शुभ्र वर्ण श्वेत वस्त्र अभय त्रिशूल वरद आणि डमरू अशा चार भुजांमध्ये चार आयुध आणि मुद्रा धारण करणारी ही जगदंबा नंदी वरती विराजमान आहे. वास्तविक नवदुर्गा म्हणजे पार्वतीच्या जीवनप्रवासाचेच टप्पे मानले पाहिजेत. शैलपुत्रीच्या रूपात हिमाचल कन्या म्हणून अवतार घेतलेली जगदंबा शिवमय होते ती महागौरीच्या रूपाने आहे.
वास्तविक ६४ वर्षाचे प्रदीर्घ तप करून स्वतःचा मूळ रंग हरवून बसलेल्या पार्वतीची भगवान शंकरांनी थट्टे मध्ये काळी म्हणून संभावना केली. त्याचा खेद मानून पुन्हा कठोर तप करून पार्वतीने आपले गौरी रूप मिळवले. तिचं हे गौर रूप भगवान शंकरांच्या कर्पूर गौररूपामध्ये एकरूप होण्याचे एक प्रतीक मानलं पाहिजे. अगदी तिच्या नावामध्ये सुद्धा महागौरी या रूपाने तिची शिवसायुज्यताच दिसते. भक्तांच्या मनातील कल्मषांचे अर्थात शंकाकुशंकांचे हरण करून त्यांना अभिष्ट देणारी ही जगदंबा सर्व भक्तांवर अशीच कृपा करो हीच तिच्या चरणी प्रार्थना करतो.