नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी नागपंचमी (Nag Panchami) 09 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती (Kaal Sarp Dosh) मिळते. तर काय आहे नागपंचमीची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
मुंबई: नागपंचमी (Nag Panchami) हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. नागपंचमी (Nag Panchmi 2024) हा सण श्रावण महिन्यातील (Shravan 2024) शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागांची पूजा केल्यानं कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
नागपंचमीचा शुभ मुहूर्त-
श्रावण महिन्यातील (Shravan 2024) शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12:36 पासून सुरू होते आणि 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:14 वाजता समाप्त होणार आहे. शुक्रवारी सकाळी 6:01 ते दुपारी 3:14 पर्यंत
नागदेवतेची पूजा करू शकता…
अशी साजरी करा नागपंचमी-
नागपंचमी दिवशी सकाळी लवकर उठावं. चौरंगावर किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढावं. शक्य असल्यास मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दही, दूर्वा, गंध, अक्षता, फुलं अर्पण करुन त्याची पूजा करावी. पूजेवेळी नाग देवतेचा मंत्रोच्चार करावा. नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प दोषाचा प्रभाव दूर होतो, असं भविष्य पुराणात सांगितल्याची अख्यायिका आहे. सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणानं नागाची मूर्ती तयार करुन त्यावर दूर्वा आणि शेंदूर लावावा. या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर, गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये. परंतु दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत, अशीही अख्यायिका आहे.
काय आहे नागपंचमीचं महत्व-
महाभारत, नारद पुराण, स्कंद पुराण, रामायण यांसारख्या ग्रंथांमध्ये सापांशी संबंधित अनेक कथा आहेत. परंतु पौराणिक मान्यतेनुसार, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळं झाला होता. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जनमेजयानं साप मारण्याचा निर्णय घेतला आणि नागदह यज्ञ सुरू केला. यज्ञामुळं जगातील सर्व नाग जळू लागले, सर्पांनी प्राण वाचवण्यासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जनमेजयाला तसं न करण्याचं पटवून दिलं. त्यामुळं सापांचे प्राण वाचले. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्यानंतर नागपंचमीचा सण साजरा केला जाऊ लागला.