‘तिरुमला’चे सुरेश कुटे, अर्चना कुटेंना बेड्या:कोट्यवधींच्या ज्ञानराधा बँक घोटाळ्यात कारवाई; पुण्याहून बीडला आणले, ठेवीदार आक्रमक..

Spread the love

*बीड-* बीडच्या राज्यभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ज्ञानराधा बँक घोटाळ्याप्रकरणी तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे, त्यांना पत्नी अर्चना कुटे आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बीड पोलिसांंनी पुण्यात ही कारवाई केली आहे.


सुरेश कुटे.

पोलिसांंनी सुरेश कुटे यांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत ज्ञानराधा बँकेच्या घोटाळ्यासंबंधीचे दस्तऐवज सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार कुटे यांना ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार तसेच आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे पोलिसांना सादर करायची आहेत.

अर्चना कुटे

*बीडला आणले…*

सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि ज्ञानराधाचे संचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता पुण्यातील हिंजवडी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर आज दुपारी तीन वाजता बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कारने आणण्यात आले. दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्याची डेडलाइन सुरेश कुटे यांना देण्यात आली आहे.

आशिष पाटोदेकर

*गॅरंटर दिला तर…*

ठेवीदारांना ते पैसे कसे देणार, या संदर्भात कुटे यांना पेालिसांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. जर हे पुरावे समाधानक कारक नसतील, तर पोलिस त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. मात्र, कुटे यांनी पोलिसांना गॅरेंटर दिला, तर त्यांची व संचालक मंडळाची सुटका होऊ शकते, असे पोलिस अधीक्षकांनी सांगीतले आहे. सुरेश कुटे यांच्यावर बीड जिल्ह्यात ज्ञानराध्याच्या ठेवी वेळेत न देवून ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल झालेले असून, पोलिस आज दुसरा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आलेला आहे.

*कृती समिती आक्रमक*

सुरेश कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच बीड येथील ठेवीदार कृती समीतीचे मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांच्यासह ठेवीदारांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. आम्ही येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ठेवीदारांची बैठक घेणार आहोत. त्यानंतर जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे असल्याची माहिती ठेवीदार कृती समितचे मुख्य प्रवर्तक सचिन उबाळे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

*आयकरची छापेमारी*

बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. बीड, पुणे, सोलापूर, फलटण, संभाजीनगर तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

*वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश*

महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.

*पीआयच्या घरामध्ये पासपोर्ट*

जिजाऊ पतसंस्थेच्या प्रकरणात 1‎ कोटींची लाच मागणी करणारा ‎‎आर्थिक गुन्हे‎‎शाखेचा पोलिस ‎‎‎निरीक्षक हरिभाऊ ‎‎खाडे याचे आता ‎‎‎ज्ञानराधा पतसंस्था ‎‎‎कनेक्शनही समोर आले आहे. ज्ञानराधाचे सुरेश कुटे व ‎यशवंत कुलकर्णी यांनी पोलिस ‎अधीक्षक कार्यालयात जमा केलेले ‎पासपोर्ट खाडेच्या घरात सापडले‎आहेत.

*तीन हजार कोटी अडकले*

ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये 6 लाख 50 हजार ठेवीदारांचे 3 हजार कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार प्रचंड आर्थिक तणावात आहेत. तात्पुरती गरज भागवावी म्हणून लोकांकडून घेतलेले देणे परत करताना ठेवीदारांच्या नाकीनऊ आले आहे. मात्र सुरेश कुटे यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुम्ही माझ्या बँकेतून पैसे काढणार आहात आणि दुसऱ्या बँकेत व्याजासाठी टाकणारच आहात तर माझ्याच बँकेत पैसे राहू द्या, असे म्हणून गरजवंत ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ठेवीदार आक्रमक होत आहेत. मागील 9 महिन्यांपूर्वी कुटे यांनी दिलेल्या चेकच्या तारखा संपत आल्याने ठेवीदार आता बँकेत चेक टाकणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ज्ञानराधाच्या 51पैकी 26शाखा बंद आहेत.

*पोलिसांकडूनही टाळाटाळ*

ऑक्टोबर 2023 मध्ये मी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो तेव्हा मला 7 महिन्यांची पुढील तारीख टाकून चेक दिला. चेकची मुदत संपत आली आहे. मी पोलिसांत गेलो मात्र त्यांनी टाळाटाळ केली. घर घेतल्यामुळे पैशाची अत्यंत गरज आहे. मुदत संपण्यापूर्वी मी चेक बँकेत टाकणार आहे. बाउन्स झाल्यास आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करणारच, अशी प्रतिक्रिया ठेवीदार शुभम सावंत, ठेवीदार यांनी दिली. गेल्या 9 महिन्यांपासून लोक सुरेश कुटे यांचे ऐकत आहेत. मात्र ठेवीदार आणखी किती दिवस वेळ देणार. शेतकरी, गोरगरीब, वयोवृध्दांना आता पैशांची खूप गरज आहे. सुरेश कुटे यांनी तत्काळ ठेवी वाटप सुरू करावे. यासाठी दोन दिवसांत ठेवीदारांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असा इशारा ठेवीदारांचे आंदोलक सचिन उबाळे यांनी दिला होता.

*न्यायालयात घेतली धाव*

आर्थिक शाखा करणार तपास ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये ठेवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने अनेक जण पोलिसांत जात आहेत. मात्र पोलिस त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने काही ठेवीदारांनी बीड जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने आतापर्यंत बीड, नेकनूर आणि माजलगावमध्ये ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यासह संचालकांवर 9 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे.

*विश्वासघात केला…*

बीडचे ठेवीदार अमोल शिंदे म्हणाले की, अडी- अडचणीला पैसे कामाला येतील म्हणून ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये पैसे ठेवले होते. केवळ व्याज मिळते म्हणून नाही तर आमचा सुरेश कुटे यांच्यावर विश्वास होता म्हणून पैसे ठेवले होते. माझी एफडी नाही खात्यात पैसे आहेत. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. बोअर घेण्यासाठी पैसे मागितले मात्र मिळाले नाहीत. खरीप हंगामासाठी बी- बियाणे खरेदी करायचे आहेत. मात्र, आता याच विश्वासाला पुर्णपणे तडा गेला आहे. यामुळे आर्थिक गणित पूर्णपणे चुकले आहे. यामुळे नवे संकट आमच्यासमोर उभे राहिले आहे.

*गुन्हे दाखल करावेत- न्यायालय*

ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल केला गेला नाही. शेवटी शहरातील खातेदारांनी न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवर सुनावणी होऊन येथील पहिले सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस. एम. यांनी शुक्रवारी माजलगाव शहर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

*संगनमताने फसवणूक-*

मल्टिस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून खातेदारांच्या ठेवी परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. शहरातील खातेदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे मल्टिस्टेटच्या खातेदार शिवकांता गौरीशंकर तोडकरी, दिनकर हांगे, दत्तात्रय पारडकर, आशाबाई पारडकर, चतुराबाई पारडकर यांनी शेवटी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेऊन ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी याचिका दाखल केली. माजलगाव येथील अॅड. नारायण गोले पाटील यांनी पहिले सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस.एम.यांच्या न्यायालयात प्रकरणावर सुनावणीत युक्तिवाद केला. दरम्यान, येथील सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस. एम. यांनी 29 एप्रिल रोजी माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना आदेश दिले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page