ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल आता सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी घोषणा केली आहे.
मुंबई – Dadasaheb Phalke Award 2023 : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदा दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. वहिदा रहमान यांची दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. वहिदा रहमान यांनी ‘गाइड’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘चौदहवीं का चांद’, ‘खामोशी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. वहिदा रहमान यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी नेहमीच प्रशंसा केली आहे.
वहिदा रहमान यांना जाहीर झाला दादासाहेब फाळके पुरस्कार :5 दशकांहून अधिक काळ गाजलेल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केलं आहे. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. वहिदा रहमान यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात येईल. तसेच वहिदा यांनी ‘दिल्ली 6’मध्ये चांगलं काम केल्यानंतर त्यांची या चित्रपटासाठी देखील खूप कौतुक करण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये त्या अभिषेक बच्चनसोबत दिसल्या होत्या.अनुराग सिंह ठाकूर यांनी केली घोषणा :केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी त्यांच्या एक्सवर ( पूर्वीचं ट्विटर ) हा सन्मान जाहीर करताना लिहिले, ‘वहिदा रहमानजी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मान वाटत आहे’. अनुराग यांनी पुढे लिहिले, ‘5 दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत, त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. वहिदाजी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे.’ असे लिहित या पोस्टद्वारे त्यांनी वहिदा रहमान यांचे कौतुक केले आहे.