चिपळूण :- तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेत बसस्थानकासमोरील तीन दुकाने रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडली . या दुकानातून हजारो रुपयांची रोकड व साहित्य चोरीला गेले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून , त्याच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत . दोन महिन्यांपूर्वी सावर्डे बाजारपेठेत चोरीच्या घटना सलग घडल्या होत्या . त्यानंतर थांबलेले हे प्रकार आता पुन्हा सुरू झाले आहेत . रविवारी मध्यरात्री साडेतीन वाजता बाजारपेठेत वक्रतुंड मोबाइल शॉपी , त्यालगतचे हार्डवेअरचे दुकान व डॉ . मोहिते यांच्या दवाखान्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली . यामध्ये मोबाइल शॉपीमधील स्मार्टवॉच व अन्य साहित्य , असे एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे , तसेच हार्डवेअर दुकानमधूनही सहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे . त्याशिवाय डॉ . मोहिते यांच्या दवाखान्यातून १६ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची माहिती सावर्डे पोलिसांनी दिली . सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून , सहायक पोलिस निरीक्षक जयवंत गायकवाड तपास करीत आहेत .
जाहिरात