जनशक्तीचा दबाव न्यूज | पुणे | फेब्रुवारी ०७, २०२३.
गावाच्या यात्रेला बाहेरगावाहून आलेल्या स्त्री-पुरुषांच्या अंगावर भरपूर दागिने होते. हे दागिने लुटण्याच्या हेतूने एका टोळक्याने दरोडा टाकण्याचा बेत आखला. त्यानुसार यात्रेत शिरण्यासाठी ते सर्व एकत्र आले. परंतु पोलिसांना याची कुणकुण लागली आणि पोलिसांनी दरोडा टाकण्यापूर्वीच टोळक्याला गजाआड केले.
याप्रकरणी पोलिस नाईक विशाल बनकर यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय ऊर्फ आकाश धनाजी सोनवणे (वय २०), प्रसाद धनाजी सोनवणे (१९), आदित्य गणेश सावंत (२०) आणि पारस श्रीकांत कांबळे (२५, सर्व रा. थेऊर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर २ ते ३ साथीदार पळून गेले़ अक्षय आणि प्रसाद यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, चोरी, आर्म ॲक्टखाली गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर गावची जत्रा होती. त्यासाठी गावात बाहेरगावी गेलेले अनेकजण आले होते. आलेल्या पाहुण्यांमध्ये महिलांच्या अंगावर भरदार दागिने होते. हे या टोळक्याने पाहिले होते. त्यानुसार त्यांनी गावातील घरावर दरोडा टाकण्याचा कट रचला. यशवंत सहकारी साखर कारखान्याचा समोरील मोकळ्या जागेत हे सर्वजण मध्यरात्री जमले होते. परंतु पोलिसांनी या टोळक्याला चारही बाजूने घेरले आणि ताब्यात घेतले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यातील २ ते ३ जण पळून गेले. पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून कोयता, मिरची पूड, नायलॉन दोरी, बॅटरी असे साहित्य जप्त केले आहे.