धामणंदमध्ये शेतकरी मेळावा; बाबाजी जाधव यांचीही उपस्थिती, जिल्हा बँकेकडून सहकार्याचे आश्वासन
धामणंद : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा दुग्धप्रकल्प कायमच शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. शेतकऱ्यांच्या हितासाठीच या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. वाशिष्ठी डेअरीच्या सोबतीला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाबार्ड हे देखील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी. प्रामाणिकपणे कष्ट केले, तर भविष्यात आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून कोकणात धवलक्रांती होईल आणि दूध उत्पादनात कोकण राज्यात क्रमांक एकवर पोहचेल, असा विश्वास वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
पंधरागाव दूध उत्पादक शेतकरी कंपनी लिमिटेड व नाबार्ड रत्नागिरी आणि श्री. विवेकानंद रिसर्च सेंटर लोटे तसेच कृषी विभाग खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य शेतकरी मेळावा बुधवारी (ता. ११) सकाळी धामणंद (ता. खेड) येथील श्री झोलाई मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात श्री. यादव बोलत होते. श्री. यादव यांनी यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या उभारणीचा प्रवास सांगितला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या उद्देशानेच या डेअरीची संकल्पना पुढे आणली, असे सांगितले. ते म्हणाले, कोकणात सहकार रुजला नाही, असे नेहमीच सांगत असतो. पण हे सांगत बसण्याऐवजी आपल्या कोकणची, आपल्या शेतकऱ्यांची क्षमता काय आहे, याचा अभ्यास व्हायला हवा होता. काही वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५०-६० हजार लिटर क्षमता असलेल्या शासकीय दूध डेअऱ्या होत्या. याचा अर्थ आपल्याकडची परिस्थिती दूध उत्पादनाला पोषक होती. मग आपण कमी कुठे पडलो, याचा अभ्यास आम्ही वाशिष्ठी डेअरी उभी करताना केला. तेव्हा लक्षात आले की शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. एखादे काम करताना तुमची कार्यपद्धती विश्वासार्ह असेल, तर लोक तुमच्या पाठिशी ठाम राहतात.
वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून ही विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम केले गेले. त्यामुळेच देवरूखपासून मंडणगडच्या टोकापर्यंत आजघडीला साडेतीन हजार दूध उत्पादक शेतकरी वाशिष्ठी डेअरीशी जोडले गेले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पाठबळावरच वाशिष्ठी डेअरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे, असेही श्री. यादव म्हणाले.