रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची राजापूर तालुका कुणबी पतपेढीला सदिच्छा भेट
राजापूर / प्रतिनिधी – ग्रामीण भागातील जनतेला चांगली सेवा देतानाच आर्थिक व सामाजिक विकासात महत्वपुर्ण भूमिका बजावणाऱ्या राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले. देशाच्या स्वांतत्र्याचा अमृतकाल आपण साजरा करत आहोत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसीत भारत संकल्प यात्रेत भविष्यात ही पतसंस्थाही महत्वाची भूमिका बजावणार असून आज ११० कोटींवर असलेली ही संस्था एक हजार कोटींवर पोहचलेली असेल अशा शुभेच्छाही ना. सावंत यांनी यावेळी दिल्या.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रविवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यानंतर रत्नागिरी कडून गोव्याकडे जाताना ना. सावंत यांनी राजापुरातील अग्रगण्य अशा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या राजापुरातील प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी बोलताना ना. सावंत यांनी राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या कामकाजाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सहकार क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. यामध्ये सहकारी बँका, पतसंस्था यांना अधिक बळकटी देण्याचे सरकारचे धोरण आहे. आपण भविष्यात फुड प्रोसेसिंग व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनाही कर्जपुरवठा करण्याचे धोरण अवलंबावे असेही ना. सावंत यांनी यावेळी नमुद केले. ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास पतसंस्थेने संपादीत केलेला आहे. सामान्य सभासदांसाठी कुणबी पतपेढी करत असलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे नमुद करून राज्य व केंद्र शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही ना. सावंत यांनी यावेळी दिली. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेत सगळयांनी सहभागी व्हा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर, राजापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, सौ. शीतल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारभी कुणबी पतपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पतपेढीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी अध्यक्ष मांडवकर यांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या पतपेढीला आज दिलेली सदिच्छा भेट ही आमच्यासाठी सुवर्णक्षण असल्याचे नमुद केले. यानंतर अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी ना. सावंत यांचा पतसंस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे संचालक बाळकृष्ण तांबे, रमेश सुद, सौ. मानसी दिवटे सौ. अमृता शिवगण. अनंत मोरवसकर सोनू तिर्लोटकर, अविनाश नवाळे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.