
उत्तरकाशी- उत्तराखंडच्या सिल्कियारा-दांदलगाव बोगद्याचा ६० मी. या भागात मलबा पडण्याचे कारण नैसर्गिक नसून मानवी आहे. १२ नोव्हेंबरला पहाटे ५.३० च्या सुमारास ढिगारा खाली पडू लागला तेव्हा घटनास्थळी एक डंपरही होता. अपघातादरम्यान डंपरमधून उडी मारून जीव वाचवणाऱ्या मजुराने हा खुलासा केला आहे.
ताे म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून बोगद्याच्या मुख्य गेटपासून २०० ते २७० मीटर अंतरावर मातीचा ढिगारा ढासळत होता. हे थांबवण्यासाठी बांधकाम कंपनीच्या अभियंत्यांनी लोखंडी गर्डर बसवले होते. बोगद्याच्या भिंतीला लागून दोन गर्डर्स बसवले आणि त्यावर एक बसले. अपघाताच्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी डंपर बोगद्यातून ढिगारा घेऊन बाहेर पडत होता. दरम्यान, त्याचा मागचा भाग गर्डरला धडकला. मी खिडकीच्या बाजूने होतो. धडकेचा आवाज ऐकताच मी उडी मारली आणि पळ काढला. त्यानंतर मागे वळून पाहिले असता बोगदा ढिगाऱ्याने भरलेला दिसला आणि डंपरही गाडला गेला. चालक पळून गेला की नाही माहीत नाही. या मजुराच्या वक्तव्याला बिहार, झारखंड आणि ओडिशातील त्या मजुरांनीही दुजोरा दिला जे अपघातापूर्वी बाहेर आले होते.
बांधकाम सुरू असताना झालेल्या अपघाताच्या चौकशीत सहभागी असलेल्या दोन अधिकाऱ्यांना भास्करने याबाबत विचारले असता, त्यांनी एवढेच सांगितले की, ढिगाऱ्यात काय दडलेय आणि काय नाही, हा नंतरचा विषय आहे. सध्या ४१ लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर बोलून बचाव कार्याची माहिती घेतली.
कामगारांमध्ये आघात व नैराश्य
कामगार बोगद्यात अडकून २०० तासांहून अधिक काळ लोटला आहे. आता त्यांना नैराश्य आणि आघाताची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांचा आवाज मंद होत आहे, जिभेला तोतरे सुटले आहे. याला कामगारांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. सध्या कामगारांना सुका मेवा, तांदूळ इत्यादी दिले जात आहेत.
▪️बचाव मोहिमेच्या नवव्या दिवशी, तिन्ही बाजूंनी ऑपरेशन सुरूआशेचा किरण :
सिल्कियाराच्या बाजूने बोगद्यातील ढिगाऱ्यात ६ इंच पाइप आरपार टाकण्यासाठी गेलेल्या बचाव पथकाला संध्याकाळी उशिरा मोठे यश आले आहे. त्यांनी ६ इंच रुंद पाइप ८० मीटर खोल ढिगाऱ्यात गाडले. ड्रिलिंग केल्यानंतर, ते मजुरांपर्यंत पाठवले. एसपी अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, आता मंगळवारपासून या पाइपद्वारे शिजवलेले अन्न, लापशी, खिचडी आणि औषधे आदी मजुरांना पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष अर्नोल्ड डिक्स हेही घटनास्थळी पोहोचले.
तीन ठिकाणांहून ड्रिलिंग सुरू, डीआरडीओचा रोबोट ढिगाऱ्यात जाऊन ढिगाऱ्यामधील स्थिती तपासणार
बचाव मोहिमेच्या ९व्या दिवशी डोंगरात तीन ठिकाणी एकाच वेळी ड्रिलिंग सुरू करण्यात आले. बोगद्यावर ८४ मीटर उभ्या ड्रिलिंगची तयारी पूर्ण झाली आहे. डीआरडीओच्या रोबोट टीमने बोगद्यात मायक्रो ड्रोन बसवले आहेत. तसेच रिमोटवर चालणारे मशीन ‘दक्ष’ पाठवले जात आहे. हे ढिगाऱ्यात आणि बोगद्याच्या लायनिंगमधील जागेत प्रवेश करेल आणि ढिगाऱ्याची स्थिती तपासेल. बोगद्याच्या दुसऱ्या तोंडावर टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या तज्ज्ञांनी लाइट ब्लास्टद्वारे ६६० मीटरचा बोगदा तयार करण्यास सुरुवात केली आहे. या बाजूला डोंगर थोडा कठीण असल्याने सुरक्षित समजला जातो.