
*मुंबई-*विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना शपथ दिली आहे. सकाळी विधानपरिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, तर शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने, अजित पवार गटाकडून शिवाजी गर्जे, राजेश विटेकर, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना शपथ देण्यात आली आहे.
*महायुतीचे सर्व उमेदवार झाले होते विजयी…*
दरम्यान, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले होते. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला होता तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता.
निवडणुकीत झाले क्रॉस व्होटिंग
दरम्यान, या निवडणुकीत शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही अधिकची मते अजितदादांच्या आमदारांना पडल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या काँग्रेसच्या आमदारावर कार्वाईचीही टांगती तलवार आहे.