
सोलापूर : सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महिन्यानंतरही कामावर न येणाऱ्या आंदोलनकर्त्या मदतनीस- सेविकांना कार्यमुक्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या. पण, आता एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांच्यावरील कारवाई थांबविण्यात आली आहे. पुढील आठवड्यात संघटनेला लेखी आश्वासन देऊन तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार ७३० अंगणवाड्या असून त्यात ग्रामीणमध्ये चार हजार ७६ अंगणवाड्या आहेत. पेन्शन लागू करा, आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, मानधन नको दरमहा वेतन द्यावे, सेविकांना दरमहा २६ हजार तर मदतनिसांना २२ हजार रुपयांचे वेतन द्यावे, ऑनलाइन कामांसाठी नवीन मोबाईल द्यावेत अशा विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाला महिना होऊनही सर्वजण कामबंदवर ठाम राहिल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार ज्या सेविका व मदतनिसांना नियुक्तीनंतर एक वर्षही झाले नाही, अशांना कार्यमुक्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, त्यामुळे आंदोलन जास्तच तीव्र झाले आणि आयुक्तांना आपला पूर्वीचा आदेश बदलावा लागला. आता राज्य सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू आहेत.



