
छत्रपती संभाजीनगर :- ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात २६ जानेवारीला मुंबईत पदयात्रा काढण्यात येणार आहे , आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी आज शनिवारी सकाळीच मराठ्यांचे हे वादळ मुंबईकडे निघणार आहे. दरम्यान, चलो मुंबई आंदोलन मागे घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना केले आहे. तथापि, आता माघार नाही, मुंबईत आंदोलन होणारच, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरू आहे. यासाठी जरांगे यांनी राज्यभरातील मराठ्यांना २० जानेवारीला मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांचा बैठकांचा धडाका सुरू आहे. लाखो मराठे, शेकडो गाड्यांचा ताफा आणि साधनसामग्रीसह मोर्चात सहभागास सज्ज आहेत. अनेक जण दोन दिवसांपासून अंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत. अंतरवाली सराटी येथून आज सकाळी जरांगे हे पायी चालत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.
मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे. समाजाने ताकदीने मुंबईकडे निघावे. मराठे कोणालाच भीत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी आणि माझा समाज २६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणारच, असे जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने बीडमधील मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधा असून, यात एका वैद्यकीय पथकाबरोबरच एसी, टी.व्ही., फ्रिज अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील आंदोलनाचा कार्यक्रम जरांगे यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यानुसार ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करून नंतर मराठा आंदोलक त्यांच्यासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत.
जाहिरात



