आज १ ऑगस्ट २०२४ रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या एका तरुणाने आकाशातील ताऱ्याला अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिलेले आहे. जाणून घ्या हे कसं शक्य झालं आणि याची प्रक्रीया.
*मुंबई /प्रतिनिधी-* लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची यंदा ही १०४ वी जयंती साजरी होत असून, त्या निमित्तानं सामाजिक, साहित्यिक व राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत. यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या एका तरुणाने आकाशातील ताऱ्याला अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिलेले आहे. हे नाव देण्याची प्रक्रिया कशी होती, यासाठी किती वेळ लागला ते आपण जाणून घेऊया.
*अशी होती प्रकिया-*
छत्रपती संभाजीनगर शहरातील सुशील तुपे यांनी आकाशातील तारा विकत घेऊन त्या ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले आहे. सुशील तुपे सांगतात की, गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेही आकाशातील ताऱ्याला नाव देण्यात आले होते. त्यावरूनच ही संकल्पना सुचली आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेऊन आपणही एक तारा विकत घेऊयात, असे आम्ही ठरवले. आपल्याला तारा विकत घेऊन त्याला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यायचे आहे, असे ठरवल्यावर भारतामध्ये याचं रजिस्ट्रेशन होत नाही, असे आम्हाला कळले.
त्यामुळे अमेरिकेतील एका संस्थेशी संपर्क साधून आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया करुन घेतली. त्यांनी आम्हाला संपूर्ण अण्णाभाऊ साठे विषयी माहिती विचारली तेव्हा आम्ही ही माहिती गोळा करताना इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केली आणि काही माहिती त्यांच्या पूर्वजांकडून गोळा करून संपूर्ण माहिती या संस्थेकडे पाठवली आणि ६ महिन्यांनी आम्हाला या ताऱ्याला अण्णाभाऊ साठेंचे नाव देण्यामध्ये यश आले. हा जो तारा अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर झालेला आहे, तो आता यापुढे कोणीही विकत घेऊ शकत नाही. तो कायमस्वरूपी फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर राहणार आहे, असेही सुशील तुपे यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे हे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते, परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणानं इतिहास घडवला. कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या. ते अष्टपैलू साहित्यिक, कलावंत होते. ‘इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन’ या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते. त्यांनी दलित साहित्याचा पाया रचला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी लेखन केलं. कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा, लावण्या, चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे.